‘कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मतदार यादी पडताळणीचे काम काळजीपूर्वक करावे’

औरंगाबाद : जिल्हयातील सर्व मतदार संघातील मतदार यादी पडताळणी प्रक्रिया अचूक व गुणवत्ता पूर्वक राबविण्याच्या सूचना राज्याचे प्रधान सचिव व मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांनी आज येथे दिल्या. जिल्हाधिकारी कार्यालय येथील सभागृहात जिल्हयातील निवडणूक कामकाज आढावा बैठक राज्याचे प्रधान सचिव व मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांच्या अध्यक्षतेखाली गुरुवारी घेतली.

यावेळी उपजिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. भारत कदम, उपजिल्हाधिकारी मंदार वैद्य, आप्पासाहेब शिंदे, उपविभागीय अधिकारी (कन्नड) जनार्धन विधाते, उपविभागीय अधिकारी (पैठण,फुलंब्री) स्वप्नील मोरे,सहायक जिल्हा पुरवठा अधिकारीधिकारी दत्ता भारस्कर, सिद्धार्थ धनजकर यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते. यावेळी श्रीकांत देशपांडे म्हणाले की, मतदार माहितीची नोंदणी प्रक्रिया ही वेळोवेळी अद्यावत करणे आवश्यक आहे. मतदार ओळखपत्रावरील मतदारांची नावे, वय, लिंग, फोटो इ. मध्ये विसंगती तसेच दुहेरी मतदार नोंदणी शोधून ते अद्यावत करणे, मृत्यूपावलेल्या मतदारांची नावे मतदान यादीतून वगळणे व इतर संबंधितकामे करताना मतदान नोंदणी अधिकारी यांनी विशेष लक्ष देऊन यादी निदोष करण्यास प्राधान्य द्यावे.

अचुक व योग्य पध्दतीने प्रक्रिया राबवत डॅशबोर्डे अद्यावत ठेवावा. त्याचबरोबर सध्याच्या वाढत्या कोरोना संसर्गाच्या काळात योग्य खबरदारी घेत व काळजीपुर्वक काम करण्याची सूचनाही श्री. देशपांडे यांनी केली. तसेच मतदार नोंदणी संदर्भात विविध प्रकारचे अर्ज व त्यांचा उपयोग आणि निवडणूक विषयक कामे करतांना येणाऱ्या अडचणी सोडविण्याच्या दृष्टीने सविस्तर मार्गदर्शन श्री. देशपांडे यांनी केले. यावेळी श्री. देशपांडे यांनी मतदान नोंदणी अधिकारी व कर्मचारी यांना काम करतांना येणाऱ्या अडचणी, समस्या जाणून घेतल्या. डॉ. भारत कदम यांनी यावेळी जिल्ह्यातील मतदार संघानिहाय मतदार नोंदणी छायाचित्र नसलेल्या मतदारांबाबतची कार्यवाही आदीसह निवडणूक विमागामार्फत करण्यात येत असलेल्या बाबींची माहिती दिली.

महत्त्वाच्या बातम्या