१९७१ च्या युद्धात सहभाग असूनही कॅप्टन सुरेंद्र सुर्वे पेन्शनपासून वंचित, आरोग्य सुविधा देण्याची मागणी

Ex-serviceman

औरंगाबाद : १९७१ च्या भारत-पाकिस्तान युद्धामध्ये प्रत्यक्ष सहभागी असणारे कॅप्टन सुरेंद्र सुर्वे यांना भारत सरकारची पेन्शन आणि सरकारी हॉस्पिटलच्या योजनेचा लाभ मिळत नाही. त्यामुळे त्यांची आर्थिक स्थिती खराब झाली आहे. आता उतार वयात त्यांना विविध आजाराने ग्रासले आहे. मात्र, त्यांच्याकडे उपचारासाठी पैसे नाहीत. अशा परिस्थितीत सरकारने त्यांना पेन्शन आणि आरोग्य सुविधा देण्याची मागणी ‘सैनिक फेडरेशन’च्या वतीने माजी सैनिक गजानन पिंपळे यांनी केली आहे.

या संदर्भात पिंपळे यांनी संघटनेच्या माध्यमातून केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांना निवेदन दिले आहे. यामध्ये वरील मागणी करण्यात आली आहे. या निवेदनात म्हटले की, ‘आपल्या आयुष्यातील जवानीचे दिवस भारतमातेच्या संरक्षणासाठी त्यांनी दिले आहेत. १९६९ मध्ये त्यांना कमिशन मिळून ते कॅप्टन झाले. त्यांनी १९७१ चे युद्ध लढले. अशा भारत मातेच्या सुपुत्रावर हलाखीची वेळ येऊ नये, ज्यांनी आपलं सर्वस्व भारतमातेसाठी समर्पण केले असे कॅप्टन सुरेंद्र सुर्वे हलाखीचे जीवन जगत आहेत.’

या सर्वात त्यांना भारत सरकारच्या वतीने मेडिकल सुविधा, पेन्शन योजना आणि विविध सरकारी योजनेचा लाभ तात्काळ देण्याची मागणी ‘सैनिक फेडरेशन’च्या वतीने करण्यात आली आहे. यावर सकारात्मक निर्णय घेण्यात येईल, अशी अपेक्षाही संघटनेच्या वतीने व्यक्त करण्यात आली आहे.

महत्त्वाच्या बातम्या