वादग्रस्त समान पाणी पुरवठा योजनेच्या निविदा अखेर रद्द

pmc

पुणे:- पुणे पालिकेचा महत्वाचा परंतु वादात अडकलेल्या समान पाणीपुरवठा योजनेच्या जलवाहिन्या टाकण्याच्या आणि पाण्याचे मीटर बसविण्यासाठीच्या वादग्रस्त निविदा रद्द करण्याचा निर्णय महापालिकेने अखेर गुरुवारी घेतला. जीएसटी मुळे या निविदा वाढीव दराने आल्या. त्यामुळे त्या रद्द करण्यात येत असल्याच महापालिका प्रशासनाकडून सांगितले जात असला तरी या वादग्रस्त निविदांच्या प्रकरणात मुख्यमंत्र्यांनीच आयुक्त कुणाल कुमार यांचे कान टोचल्यामुळे फेरनिविदा काढण्याची वेळ महापालिकेवर आली आहे. त्यामुळे जलवाहिनी टाकण्याच्या एक हजार ७१८ कोटी रुपयांच्या निविदा रद्द करण्यात आल्या असून फेरनिविदा काढण्यात येणार आहेत. फेरनिविदा काढताना जलवाहिनी आणि मीटर बसविण्यासाठी एकत्रित निविदा प्रक्रिया राबविण्यात येणार आहे.
काय आहे प्रकरण
पालिकेने समान पाणीपुरवठा योजनेअंतर्गत विविध टप्प्यांमधील कामे हाती घेण्यात आली होती. साठवणूक टाक्यांची उभारणी, सोळाशे किलोमीटर लांबीच्या जलवाहिन्या टाकणे आणि पाण्याचे मीटर बसविणे अशी कामे प्रस्तावित होती. ही योजना सुरुवातीपासूनच विविध कारणांनी वादात सापडली होती. त्यातच जलवाहिन्या टाकण्यासाठी काढण्यात आलेल्या एक हजार ७१८ कोटी रुपयांच्या निविदा सव्वीस टक्के वाढीव दराने आल्यामुळे त्या वादग्रस्त ठरल्या होत्या. अखेर त्या निविदा रद्द करण्यात आल्या आहेत.