सदाभाऊंची रयत क्रांती खा.राजू शेट्टींसाठी आव्हान ठरणार का ?

कोल्हापूर : कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांची रयत क्रांती संघटना खा. राजू शेट्टी यांच्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेपुढे आव्हान निर्माण करण्यात यशस्वी ठरणार का याचीच चर्चा दक्षिण महाराष्ट्राच्या साखर पट्ट्यात रंगली आहे. पावणे दोन वर्षांनी होणाऱ्या लोकसभा निवडणुकीत हातकणंगले मतदारसंघात एकेकाळचे हे जिवलग मित्र एकमेकांपुढे उभे ठाकणार का याचीही उत्सुकता संपूर्ण साखर पट्ट्याला लागली आहे.

सदाभाऊ व खा. शेट्टी यांच्यात गेल्या वर्ष दीड वर्षांपासून धुसफूस चालू होती असे सांगितले जात होते . मोदी सरकार सत्तेवर आल्यावर खा . शेट्टी यांना केंद्रात मंत्रिपदाची अपेक्षा होती . मात्र ती पूर्ण झाली नाही. रामदास आठवलेंना मंत्रिपद दिले गेल्याने खा. शेट्टी आणखीनच नाराज झाले. राज्यात स्वाभिमानीला एक मंत्रीपद द्यायचे ठरले होते. हे मंत्रीपद दीड वर्षांच्या प्रतीक्षेनंतर सदाभाऊ खोत यांना मिळाले. तेंव्हापासूनच खोत आणि खा. शेट्टी यांच्यातील संबंध ताणले जाण्यास सुरुवात झाली असे सांगितले जाते.

खा. शेट्टी यांच्या निकटच्या मंडळींनी या दोघा नेत्यांतील ही दरी आणखी कशी वाढेल याची पद्धतशीर काळजी घेतली. जिल्हा परिषद निवडणुकीत सदाभाऊंनी आपल्या मुलाला उमेदवारी दिल्यामुळे खा शेट्टी यांनी आपली नाराजी जाहीरपणे व्यक्त केली . खोत यांच्या मुलाच्या विरोधात खा. शेट्टी यांचेच कार्यकर्ते उघडपणे हिंडत असल्याने सदाभाऊंच्या मुलाचा पराभव झाला. तेंव्हापासून शेट्टी – खोत यांच्यातील संबंध आणखी ताणले गेले. त्याची परिणती खोत यांची स्वाभिमानी शेतकरी संघटनेतून हकालपट्टी होण्यात झाली.

या स्थितीत खोत यांना आपले अस्तित्व टिकवण्यासाठी नव्या संघटनेची स्थापना करण्याशिवाय पर्याय नव्हता. सरकारमध्ये राहून शेतकरी चळवळीत सक्रिय राहिल्याशिवाय आपल्या राजकीय अस्तित्वाला अर्थ राहणार नाही हे लक्षात आल्यानेच त्यांनी रयत क्रांती ची स्थापना केली आहे. आता २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत खोत यांना शेट्टी यांच्या विरोधात उभे केले जाणार का याची उत्सुकता शेतकरी चळवळीतील कार्यकर्त्यांना लागली आहे. काँग्रेस – राष्ट्रवादीची सध्याची भूमिका खा. शेट्टी यांना बळ देण्याची आहे. तसे झाल्यास खोत – शेट्टी हा सामना चांगलाच रंगेल यात शंका नाही.

 

You might also like
Comments
Loading...