शिक्षिकेने कान पिरगळला; कायमस्वरूपी निलंबन करण्याची पालकांची मागणी

केंब्रिज school nasik

नाशिक : नाशिकरोड येथील एमराल्ड हाईट्स शाळेतील विद्यार्थ्यांना झालेल्या मारहाणीची घटना ताजी असतांना आज नाशिक शहरातील इंदिरानगर येथील केंब्रिज शाळेतही, रंगपेटी आणली नाही म्हणून वर्गशिक्षिकेने विद्यार्थ्यांचा कान पिरगळून शारीरिक इजा केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकाराने पालक वर्गात खळबळ उडाली असून सदर शिक्षिकेला कायमस्वरूपी निलंबित करण्याची मागणी विद्यार्थ्याच्या पालकांनी केली आहे.

दरम्यान, शाळा व्यवस्थापनाने पालकांच्या तक्रारीनंतर संबंधित शिक्षिकेला चौकशी होईपर्यंत निलंबित केले आहे.केंब्रिज शाळेत हा प्रकार घडल्याने केंब्रिज शाळा पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. केंब्रिज शाळेत सिनियर केजी मध्ये शिकत असलेल्या पार्थ केतन गुंजाळ या ५ वर्षांच्या मुलाने बुधवार दि.७ रोजी रंगपेटी आणली नव्हती. यामुळे वर्ग शिक्षिका अंतरा बॅनर्जी यांचा राग अनावर झाला व त्यांनी पार्थ चा कान जोरात पिरगळला. वेदनेने पार्थ रडत असूनही त्याकडे दुर्लक्ष करीत त्यांनी अधिक जोराने कान पिरगळल्याने पार्थच्या कानाला जखम झाली असून कान सुजला आहे.

शाळा सुटल्यानंतर घरी आलेल्या पार्थची अवस्था बघून पालकांनी त्याला उपचारासाठी दवाखान्यात नेले व आज गुरुवार दि.८ रोजी शाळेत जाऊन सदर शिक्षिकेला जाब विचारला व शाळा व्यवस्थापनाकडे तक्रार केली. दरम्यान, हा प्रकार पालक-शिक्षक संघाच्या पदाधिकाऱ्यांनाही कळल्याने प्रकरण वाढण्याची शक्यता लक्षात घेऊन संस्थेच्या ट्रस्टी भारती रामचंद्र यांनी वर्गशिक्षिका अंतरा बॅनर्जी यांना चौकशी होईपर्यंत निलंबीत करण्याचा लेखी आदेश दिला. सदर शिक्षिकेकडून यापुर्वीही अनेक विद्यार्थ्यांना शिक्षा करण्याचे प्रकार घडले असून याबाबत तक्रारीही करण्यात आल्या असल्याची प्रतिक्रिया यावेळी काही पालकांनी व्यक्त केली.