‘या’ राज्यातील विरोधकांनी राज्यपालांची भेट घेऊन केला सत्ता स्थापनेचा दावा

नवी दिल्ली – कर्नाटक विधानसभा निवडणुकीत भाजपकडे पूर्ण बहुमत नसताना देखील राज्यपाल वजुभाई वाला यांनी भाजपला सत्ता स्थापनेसाठी बोलावल्याने काँग्रेसने या विरोधात सुप्रीम कोर्टात दाद मागितली होती. सुप्रीम कोर्टाने भाजपला आज ४ वाजता बहुमत सिद्ध करण्याचे आदेश दिले आहेत. आज बी. एस. येडियुरप्पा विश्वास दर्शक ठरावाला समोर जाणार आहेत. त्यांच्यापुढे बहुमत सिद्ध करण्याच मोठ आव्हान असणार आहे.

दरम्यान दुसरीकडे गोवा, मणिपूर, बिहार व मेघालय या चार राज्यांतील सर्वात मोठ्या पक्षांनी शुक्रवारी राज्यपालांना भेटून सरकार स्थापनेचा दावा केला आहे. कर्नाटकमध्ये भाजप सर्वात मोठा पक्ष असल्याने राज्यपालांनी त्यांना सत्ता स्थापनेसाठी बोलावले, मग राज्यपालांनी आम्हाला देखील बोलवावे असं त्यांनी म्हंटलं आहे.

गोव्यात विधानसभेतील विरोधी पक्षनेते बाबू कवळेकर यांनी राज्यपाल मृदुला सिन्हा यांची भेट घेतली आणि ४0 सदस्यांपैकी काँग्रेसकडे सर्वाधिक १६ आमदार असल्याने आम्हाला सरकार स्थापनेसाठी बोलवावे, अशी विनंती केली. तिथे भाजपाचे १३ आमदार आहेत. बिहारमध्ये तेजस्वी प्रसाद यादव यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रीय जनता दल, काँग्रेस व अन्य पक्षांच्या नेत्यांनी राज्यपाल सतपाल मलिक यांची भेट घेतली. तिथे राजदकडे ८0 आमदार तर सत्ताधारी जदयूकडे ७१ आमदार आहेत. मणिपूरचे माजी मुख्यमंत्री ओकराम इबोबी सिंग यांनीही कार्यवाहक राज्यपाल जगदीश मुखी यांची भेट घेतली आणि सत्तास्थापनेचा दावा केला. दरम्यान आता भाजपच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.