काँग्रेस, भाजपच्या कार्यकाळाचा आढावा घेण्यासाठी संसदेचे विशेष अधिवेशन बोलवा – पृथ्वीराज चव्हाण

Former Maharashtra Chief Minister Prithviraj Chavan

सातारा : वाढती बेरोजगारी, शेतक-यांचे प्रश्‍न आणि बंद पडलेले उद्योग यामुळे भाजप सरकारविरोधात देशभर असंतोष पसरला आहे. या नैराश्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संसदेत काँग्रेसवर पोरकट व बिनबुडाचे आरोप केले आहेत. त्यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. काँग्रेसने साठ वर्षांत काय केले आणि भाजप सरकारने त्यांच्या कार्यकाळात काय केले, याची समोरासमोर चर्चा करण्यासाठी संसदेचे विशेष अधिवेशन बोलवा, असे खुले आव्हान माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी सरकारला दिले आहे.

भाजपच्या लोकशाहीविरोधी कारभाराचा आणि त्यांच्या अपयशी राजकीय कारकिर्दीचा पाढाच आ. चव्हाण यांनी पत्रकार परिषदेत वाचला. केंद्राप्रमाणे महाराष्ट्रातही काँग्रेस सरकारने सत्तेवर असताना भाजपच्या तुलनेत काय केले हे पाहण्यासाठी राज्य विधिमंडळाचेही विशेष अधिवेशन बोलवावे, असे सांगतानाच आ. चव्हाण म्हणाले, वाढती बेरोजगारी व शेतीचे प्रश्‍न हे गंभीर विषय समोर असताना या विषयावरून जनतेचे लक्ष वळवण्यासाठी पंतप्रधान मोदी यांनी संसदेत काँग्रेसवर खालच्या पातळीवर जाऊन आरोप केले आहेत. हे करताना संसदेचे पावित्र्यही त्यांची जपले नाही. निवडणुकीचे राजकीय भाषण त्यांनी संसदेत केले. हा निव्वळ पोरकटपणा आहे. देशाच्या राजकीय इतिहासात असे घडलेले नाही. देशातील सध्य स्थिती भयंकर आहे. लोकशाहीचा गळा घोटला जात आहे.

नोटाबंदी, जीएसटीवरून सरकार गोंधळलेले आहे. शेतीचे प्रश्‍न अधिकच गंभीर बनले आहेत. शेती उत्पादनाला हमी भाव नाही. बजेटमध्ये मोठमोठ्या घोषणा केल्या मात्र, त्यासाठीची आर्थिक तरतूद कशी करणार हे सांगितले नाही. आरोग्य विमा हा काही नवीन विषय नाही तो अनेक राज्य सरकारांनी राबविला आहे. या योजनेतही त्यांनी जनतेची दिशाभूल केली आहे. मंत्र्यांवरच त्यांचा विश्‍वास नसल्याने देशाचा कारभार एककल्ली सुरू आहे. उत्पादन खर्चाच्या दिडपट दर देणार असे सरकार सांगते पण उत्पादन खर्च कमी दाखवून शेतकर्‍यांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न आहे.सर्वच पातळ्यावर हे सरकार अपयशी ठरले आहे. जनतेमध्येही सरकार विरोधात देशभर वातावरण आहे, असेही आ. पृथ्वीराज चव्हाण म्हणाले.