पूरग्रस्त भागाच्या मदतीसाठी केंद्र सरकारकडे सहा हजार आठशे तेरा कोटी रूपयांची मागणी

टीम महाराष्ट्र देशा- राज्यातल्या पूरग्रस्त भागाच्या मदतीसाठी केंद्र सरकारकडे सहा हजार आठशे तेरा कोटी रूपयांची मागणी करण्याचा निर्णय काल राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. या निधीपैकी, पश्चिम महाराष्ट्रातल्या सांगली, कोल्हापूर, सातारा जिल्ह्यांसाठी चार हजार सातशे आठ कोटी रूपये तर कोकण, नाशिक आणि इतर आपत्तीग्रस्त जिल्ह्यांसाठी दोन हजार एकशे पाच कोटीं रूपये मदतीची मागणी करण्यात येणार आहे.

ही मदत प्राप्त होईपर्यंत राज्य आपत्ती निवारण निधीतून पूरग्रस्तांना मदत केली जाणार आहे. याबाबत मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळ उपसमिती नियुक्त करण्यात आली असून याबाबतचे पुढील निर्णय घेण्याचे अधिकार या समितीला देण्यात आले आहेत.

कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातल्या पूरग्रस्तांसाठी विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्या सहकार्यानं औरंगाबाद जिल्ह्यातून एक कोटी रूपयांचा धनादेश मुख्यमंत्री मदत निधीत जमा करण्यात आला. काल ही रक्कम मुंबईत जमा करण्यात आली.

दरम्यान औरंगाबाद महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांच्या वतीनं पूरग्रस्तांना १६ लाख रूपये देण्यात येणार आहेत. काल पालिकेच्या आरोग्य विभागाचं एक पथक औषधींसह या दोन्ही जिल्ह्यांकडे रवाना करण्यात आलं

नांदेड शहरातही या दोन जिल्ह्यांच्या मदतीसाठी मदत फेरी काढण्यात आली. सर्वपक्षीय नेते या मदत फेरीत सहभागी झाले होते. फेरीत जमा झालेली मदत जिल्हाधिकारी अरूण डोंगरे यांच्याकडे सुपुर्द करण्यात आली.

महत्वाच्या बातम्या