अखेर मुहूर्त ठरला, पावसाळी अधिवेशानापूर्वी होणार राज्यात मंत्रीमंडळ विस्तार

maharashtra bjp leaders meeting in delhi

टीम महाराष्ट्र देशा: राज्यातील विधानसभा निवडणूक अवघ्या ३ महिन्यांवर येऊन ठेपली आहे, मात्र अद्याप बहुप्रतीक्षित मंत्रिमंडळ विस्तार कधी होणार हे निश्चित झालेले नसल्याने मंत्रिपदासाठी अनेकांना वेटिंगवर रहावे लागले आहे. मात्र आता भाजपकडून निवडणुकीची जय्यत तयारी सुरु झाल्याचं दिसत आहे. यामुळे येत्या आठवड्यात मंत्रिमंडळ विस्ताराचे संकेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत.

राज्यातील प्रमुख नेत्यांची बैठक काल भाजप अध्यक्ष अमित शहा यांच्या उपस्थितीमध्ये पार पडली, तत्पर्वी नवीन महाराष्ट्र सदनात राज्य कोअर कमिटीची बैठक आयोजित करण्यात आली होती, यावेळी पावसाळी अधिवेशनापूर्वी मंत्रीमंडळ विस्तार निश्चित होणार असल्याचं देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले आहे. या बैठकीला केंद्रीय सह संघटन मंत्री व्ही. सतीश, महाराष्ट्राचे संघटन मंत्री विजय पुराणिक, प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, महसूल मंत्री चंद्रकांत पाटील, विनोद तावडे, पंकजा मुंडे, संभाजी पाटील निलंगेकर, रवींद्र चव्हाण, गिरीश महाजन, सुभाष देशमुख, आशिष शेलार आदी नेते उपस्थित होते.

दरम्यान, राज्यामध्ये आगामी विधानसभा निवडणूक भाजप – शिवसेना एकत्र लढणार असले तरी मुख्यमंत्री हा भाजपचाच होईल असा सूर बैठकीत निघाला आहे. महाराष्ट्रात शिवसेनेसोबत विधानसभेला युती ही राहणारच. ज्याप्रमाणे लोकसभेला मोदींना पंतप्रधान बनवण्यासाठी काम केलं. तसंच विधानसभेला युती तर होणार मात्र मुख्यमंत्री भाजपचा असेल, असं दिल्लीत झालेल्या भाजपच्या मंथन बैठकीत अमित शहा यांनी स्पष्ट केल्याची माहिती समोर आली आहे.