शिवाजीनगर ते हिंजवडी मेट्रो महामार्गाला राज्य मंत्रीमंडळाची मंजुरी

pune metro

पुणे : हिंजवडी ते शिवाजीनगर या तब्बल 23 कि.मीच्या मेट्रोला आज राज्याच्या मंत्रीमंडळाने मंजूरी दिली.  तब्बल 8313 कोटी रुपयांचा हा प्रकल्प अवघ्या 48 महिन्यात पूर्णत्वास जाणार आहे अशी माहिती पालकमंत्री गिरीश बापट यांनी मंगळवारी पत्रकारांना दिली. 

       ते म्हणाले हिंजवडी ते शिवाजीनगर या मेट्रोमार्गावर एकूण 23 स्थानके असतील.  सार्वजनिक व खाजगी सहभागाने दिल्ली मेट्रो रेल कार्पोरेशन आणि पी.एम.आर.डी.ए. यांच्यामार्फत हा प्रकल्प राबविला जाणार आहे.  दिल्ली मेट्रो रेल कार्पोरेशनने नोव्हेंबर 2016 मध्ये या प्रकल्पाचा आराखडा तयार केला तो डिसेंबर 2016 मध्ये पी.एम.आर.डी.ए.च्या सभेत मंजूर करण्यात आला. 

या प्रकल्पाचा कालावधी 48 महिन्यांचा असून तीन डब्यांच्या मेट्रोतून एका वेळी 764 प्रवासी प्रवास करु शकतील.  बापट पुढे म्हणाले सन 2021 मध्ये 2 लाख 61 हजार प्रवाशांना या सेवेचा लाभ मिळेल.  या प्रकल्पाचा एकूण खर्च 8313 कोटी रुपये असून त्यापैकी केंद्र सरकार 1137 कोटी रुपये देणार आहे. तर राज्याचा वाटा 812 कोटी रुपयांचा असणार आहे आणि उर्वरित रक्कम खाजगी भागीदारीतून उभी केली जाणार आहे. 

मेट्रोचा पहिला टप्पा स्वारगेट ते पिंपरी व वनाज ते रामवाडी हा प्रगती पथावर असून पहिल्या टप्प्यातील 31 कि.मी. मार्गाला यापूर्वीच मंजूरी मिळाली आहे.  मेट्रोचा विविध प्रकल्पांसाठी नव्या वर्षात साडेसहा हजार कोटी रुपयांचा निधी अपेक्षीत आहे.  शासनासह विविध वित्तीय संस्थांकडून हा निधी मिळेल.  50 लाखाहून अधिक पुणेकरांना महामेट्रोचा लाभ मिळणार असून या प्रकल्पाची कामे वेळेपूर्वीच संपविण्याचा आमचा इरादा आहे.