नैतिकतेच्या आधारावर मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा; ‘आप’ची मागणी

preeti-menon-aap-leader

मुंबई : धर्मा पाटील यांच्या मृत्यूप्रकरणी फडणवीस सरकार जबाबदार असून नैतिकतेच्या आधारावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी आम आदमी पक्षाने केली आहे. फडणवीस सरकारवर आता ३०२ चा गुन्हा दाखल झाला पाहिजे. नैतिकतेच्या आधारे फडणवीस सरकारने राजीनामा दिला पाहिजे, अशी मागणीही ‘आप’च्या नेत्या प्रीती मेनन यांनी केली आहे.

देवेंद्र फडवणीस यांच्या सरकार दरबारी न्याय मिळवण्यासाठी खस्ता खाणाऱ्या आणि हतबलतेतून आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या धर्मा पाटील यांचे अखेर निधन झाले. जे.जे. रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. धुळ्यातील शेतकरी धर्मा पाटील यांची ५ एकर जमीन सरकारने औष्णिक विद्युत केंद्रासाठी संपादित केली होती. मात्र योग्य मोबदला न मिळाल्यानं त्यांना मंत्रालयाच्या पायऱ्या झिजवाव्या लागल्या होत्या. सरकारदरबारी काहीच होत नसल्याने त्यांनी विष पिऊन आत्महत्येचा प्रयत्न केला.

मात्र, उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. फडणवीस हे विरोधी पक्षात असताना शेतकऱ्यांच्या आत्महत्या प्रकरणात सरकारवर ३०२ चा गुन्हा दाखल करण्याची मागणी करीत होते. आता धर्मा पाटील या शेतकऱ्याने मंत्रालयात विष पिऊन आत्महत्या केली आहे. या मृत्यूला कारणीभूत फडणवीस सरकार आहे.