एकाच रस्त्याचे दोनदा भूमिपूजन करुन महाविकास आघाडीच्या नेत्यांनी केली अनोखी ‘वचनपूर्ती’..!

एकाच रस्त्याचे दोनदा भूमिपूजन करुन महाविकास आघाडीच्या नेत्यांनी केली अनोखी ‘वचनपूर्ती’..!

eknath shinde

औरंगाबाद : औरंगाबाद महापालिका निवडणुका तोंडावर येऊन ठेपल्याने शिवसेना-भाजपसह इतर पक्षांकडूनही जोरदार तयारी सुरु आहे. मंगळवारी शहरात विजयनगर चौक ते शिवनेरी कॉलनी रस्त्याचे भूमिपूजन नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते झाले. मात्र यापूर्वी १० जानेवारी रोजी याच रस्त्याचे सार्वजनिक आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी भूमिपूजन केले होते. एकाच रस्त्याचे महाविकास आघाडीच्या नेत्यांनी दोन वेळेस भूमिपूजन केल्याने शहरात एकच हशा पिकला आहे.

महाविकास आघाडीची वचनपूर्ती या शीर्षकाखाली १० जानेवारी रोजी राज्याचे सार्वजनिक आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या उपस्थितीत वॉर्ड क्रमांक ९२, बाळकृष्णनगर, शिवनेरी कॉलनी या भागात महानगर पालिकेमार्फत करण्यात येणाऱ्या ३०० मीटर सिमेंट काँक्रीटच्या रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन करण्यात आले होते. मात्र नंतर कोरोना, लॉकडाऊन असल्याने रस्त्याचे काम पुढे सरकले नाही. आता काही प्रमाणात परिस्थिती निवळताच पुन्हा याच रस्त्याचे नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्तेही भूमिपूजन केले.

२०१७ मध्ये याच रस्त्याच्या कामासाठी ४४ लाख ९७ हजार ३५० रुपयांची वर्क ऑर्डरही काढली होती. स्थानिक नगरसेविकेने रस्त्याचे काम तत्काळ पूर्ण करावे या संदर्भात संबंधितांना वारंवार पत्रव्यवहारही केला. दरम्यानच्या काळात या ठिकाणी भूमिगत पाईपलाईनचे काम करण्यात आले, मात्र नंतर महापालिकेची आर्थिक स्थिती, कोविड अशा अडचणींमुळे रस्त्याचे काम होऊ शकले नाही. दरम्यान जानेवारी महिन्यात आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या उपस्थितीत याच रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन करण्यात आले. आणि मंगळवारी पुन्हा एकदा नगरविकास मंत्र्यांच्या हस्ते दुसऱ्यांदा या रस्त्याचे भूमिपूजन झाल्याने याविषयी शहरात एकच चर्चा सुरू आहे.

महत्त्वाच्या बातम्या