…पण तोच ‘कुऱहाड’ बनून ‘गोतास काळ’ होऊ लागला तर कसे व्हायचे!

farm

मुंबई : गत तीन दिवसांपासून जिल्ह्यातील वातावरणात बदल हाेवून अवकाळी पाऊस बरसत आहे. बुधवारी रात्री आणि गुरुवारी दुपारी जिल्ह्यात सर्वत्र अवकाळी पाऊस बरसला तर भंडारा, साकाेली, लाखनी आणि माेहाडी तालुक्यांतील काही भागात गारांचा वर्षाव झाला. भंडारा शहरात तीन ते चार मिनीट तुरीच्या आकाराएवढ्या गारांसह अर्धा तास पाऊस बरसला. पवनी तालुक्यातील आसगाव परिसराला वादळी पावसाचा तडाखा बसला.

वाचा आजचा सामना अग्रलेख : 

कधी अतिवृष्टी तर कधी अवकाळी अशा दुष्टचक्रात महाराष्ट्रातील शेती सापडली आहे. ना खरीपाचे पीक मिळते ना रब्बीचा हंगाम हाताशी येतो. आता दोन-तीन दिवसांपासून राज्यात पुन्हा एकदा अवकाळीची ‘वक्र’वृष्टी होत आहे. केंद्राचा ‘आखडता हात’ राज्यातील शेतकऱयांपर्यंत पोहोचत नसला तरी राज्य सरकारच्या मदतीचा हात प्रत्येक अवकाळीग्रस्त शेतकऱयापर्यंत पोहोचत असतोच. पण निसर्गाची लहर कशी थोपविणार हा प्रश्न शेवटी उरतोच. पर्जन्यराजा हा शेतकऱयाचा मायबाप, पण तोच अवकाळीची ‘कुऱहाड’ बनून ‘गोतास काळ’ होऊ लागला तर कसे व्हायचे!

अवकाळी पाऊस आणि लहरी हवामान महाराष्ट्राची पाठ सोडायला तयार नाही. दर दोन-अडीच महिन्याने निसर्गाच्या लहरीचा तडाखा राज्यातील शेतकऱयाला बसतो. त्याच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावून नेतो. गेल्याच महिन्यात अवकाळी पावसाने राज्याला दणका दिला होता. आता परत सर्वत्र अवचित पावसाने हजेरी लावल्याने उभ्या पिकांचे नुकसान झाले आहे. काही ठिकाणी तर गारपिटीचाही तडाखा बसला आहे.

कोकणापासून विदर्भापर्यंत आणि पश्चिम महाराष्ट्रापासून मराठवाडा-उत्तर महाराष्ट्रापर्यंत सर्वत्र अवकाळी पावसामुळे शेतीचे नुकसान झाले आहे. विदर्भात नागपूरसह बुलढाणा, वाशीम, अकोला, गोंदिया, भंडारा या जिल्हय़ांत मंगळवार आणि बुधवारी झालेल्या पावसाने भाजीपाल्यासह कडधान्य पिकाचेही नुकसान झाले आहे. त्याशिवाय रब्बी हंगामाचे मुख्य पीक असलेल्या गव्हालादेखील फटका बसण्याची शक्यता आहे. विदर्भातील शेतकऱयाच्या मागील खरीप हंगामावर मावा-तुडतुडे वगैरे रोगाने हल्ला केला होता. त्यामुळे बळीराजाच्या हाती अर्धे पिकदेखील आले नव्हते. खरीपाची उणीव रब्बीमध्ये भरून काढू अशी आस शेतकरी लावून होता, पण त्याच्या या आशेवर पाणी फेरले गेले आहे. खरीपाला पर्याय म्हणून विदर्भात शेतकऱयांनी गहू, हरभरा, तूर, वाटाणा, जवस, लाख आदी पिकांची लागवड केली होती. मात्र दोन दिवसांतील पावसाने उभे पीक आडवे केले. गहू तर अक्षरशः भुईसपाट झाला आहे.

काही भागांत गारपीटदेखील झाल्याने संत्र पिकाचे नुकसान झाले. ‘संत्रा गळाला आणि गहू झोपला’ अशी स्थिती येथील शेतीची झाली आहे. कापसाची बोंडे भिजल्याने त्याचे काय करायचे ही चिंता कापूस उत्पादकांना भेडसावीत आहे. मराठवाडा, प. महाराष्ट्र आणि कोकणातही अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. सांगली, सातारा आणि सोलापूरमध्ये विजांच्या कडकडाटासह पर्जन्यवृष्टी झाली. कोकणातही यापेक्षा वेगळे घडलेले नाही. त्यामुळे प. महाराष्ट्र आणि कोकणातील बागायतदार शेतकऱयांच्या काळजीत भर पडली आहे. अशा पावसाने कोकणातील आंबा तसेच काजू, कोकम पीक धोक्यात आणले होते. आता दुसऱयांदा पावसाचा तडाखा बसल्याने कसेबसे वाचलेले पीक हातातून जाते की काय, अशी भीती शेतकऱयांना वाटणे साहजिक आहे. आधीच या वर्षी थंडीने लपंडाव केला. कधी गारवा तर कधी उष्मा, कधी अवकाळीचा शिडकावा तर कधी तडाखा. खरीपाचे पीक गेले तर रब्बीचे घेऊन कसर भरून काढू या आशेने बळीराजा प्रत्येक वेळी शेतीचे ‘पुनश्च हरिओम’ करतो. कष्टाने, मेहनतीने शेत हिरवेगार करतो. पिकेदेखील छान डोलू लागतात. मात्र सगळे सुरळीत सुरू असतानाच अवकाळीची कुऱ्हाड या डोलणाऱया पिकांवर पडते.

उभे पीक आडवे होते आणि शेतकऱयाच्या आशादेखील डोळय़ातील अश्रूंसोबत वाहून जातात. कधी अतिवृष्टी, कधी महापूर, कधी चक्रीवादळ, तर कधी अवकाळी अशा दुष्टचक्रात महाराष्ट्रातील शेती गेल्या काही वर्षांपासून सापडली आहे. मागील वर्षात काय किंवा आता नवीन वर्षाच्या सुरुवातीला काय, निसर्गाच्या लहरीपणाचा अनुभव महाराष्ट्राला सातत्याने येत आहे. ‘दुष्काळात तेरावा महिना’ अशी म्हण आहे, पण अलीकडील काळात राज्यासाठी ‘पावसाचा तेरावा महिना’ अशी नवीन म्हण रूढ होण्याची भीती आहे. त्याची कारणे काय असतील ती असतील, पण शेवटी उद्ध्वस्त होतो तो सामान्य शेतकरीच. ना खरीपाचे पीक मिळते ना रब्बीचा हंगाम हाताशी येतो. जे काही पिकते ते अवकाळी आणि गारपीट यांच्या तडाख्यात नष्ट होते.

गेल्या महिन्यात तेच झाले. आता दोन-तीन दिवसांपासून राज्यात पुन्हा एकदा अवकाळीची ‘वक्र’वृष्टी होत आहे. केंद्राचा ‘आखडता हात’ राज्यातील शेतकऱयांपर्यंत पोहोचत नसला तरी राज्य सरकारच्या मदतीचा हात प्रत्येक अवकाळीग्रस्त शेतकऱयापर्यंत पोहोचत असतोच. आताही राज्य सरकार बळीराजाच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहीलच, पण निसर्गाची लहर कशी थोपविणार हा प्रश्न शेवटी उरतोच. पर्जन्यराजा हा शेतकऱयाचा मायबाप, पण तोच अवकाळीची ‘कुऱहाड’ बनून ‘गोतास काळ’ होऊ लागला तर कसे व्हायचे!

महत्वाच्या बातम्या