पुणे महानगरपालिका महाविद्यालयांमध्ये व्यवसाय शिक्षण अभ्यासक्रमाचा १००% निकाल

Business education courses

पालिकेच्या इयत्ता ११ वी व १२ वी च्या विद्यार्थ्यांनी दोन वर्षाचा (लेवल-३ आणि लेवल -४) ‘बहुविध कौशल्य विकास’ व रिटेल अभ्यासक्रम यशस्वीरीत्या पूर्ण केला असून नुकत्याच लागलेल्या १२ वी च्या निकालामध्ये या व्यवसाय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचा निकाल १००% लागला आहे. शालेय वर्ष २०१६-१७ पासून पथदर्शी प्रकल्प म्हणुन पुणे महानगरपालिकेच्या उच्च माध्यमिक महाविद्यालयांमध्ये (११वी-१२वी) विद्यार्थ्यांना NSQF अंतर्गत रिटेल व मल्टी स्किल व्यवसायलक्षी शिक्षण उपलब्ध करून देण्यात आले होते. यासाठी लेंड-अ-हँड इंडिया आणि पुणे महानगरपालिका यांच्या संयुक्त सहकार्याने राष्ट्रीय माध्यमिक शिक्षा अभियानाच्या माध्यमातून पुणे महानगरपालिकेच्या एकूण ४ महाविद्यालयांची व्यवसाय शिक्षणासाठी निवड करण्यात आली होती. या व्यवसायलक्षी अभ्यासक्रमात मल्टी स्कील अंतर्गत अभियांत्रिकी, फॅब्रीकेशन, शेती-बागकाम तंत्रज्ञान, आरोग्य, इलेक्ट्रिशियन आणि अन्न प्रक्रिया व सुरक्षा या पाच उप विषयांसह रिटेल या विषयाचा अंतर्भाव होता. या अभ्यासक्रमाचा विद्यार्थ्याना फायदा होणार असून. भविष्यात स्वयंरोजगार उभारण्याकरीता आणि पुढील तांत्रिक शिक्षणासाठी हा बहुविध कौशल्य अभ्यासक्रम विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त ठरणार आहे.

१२ वी मध्ये व्यवसाय शिक्षण पूर्ण करणाऱ्या या विद्यार्थ्यांची परीक्षा NSDC मान्यताप्राप्त सेक्टर स्किल कौन्सिल आणि राज्य व्यावसायिक परीक्षा मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने घेण्यात आली. या अभ्यासक्रमाला NCERT शी संल्गन असलेल्या पंडित सुंदरलाल शर्मा सेन्ट्रल इंस्टीट्यूट ऑफ वोकेशनल एज्युकेशन तर्फे राष्ट्रीय पातळीवर मान्यता देण्यात आलेली आहे.

यापूर्वी २०१४ मध्ये लेंड अ हँड इंडियाच्या सहकार्याने पुणे महानगरपालीकेच्या निवडक दहा शाळांमध्ये इयत्ता ९ वी पासुन MSFC (मल्टी स्कील फौंडेशन कोर्स) व रिटेल या व्यवसाय शिक्षण विषयांच्या अभ्यासक्रमांची अंमलबजावणी सुरु करण्यात आली होती.
हा संपुर्ण उपक्रम विद्यार्थ्यांना मोफत असून लेंड-अ-हँड इंडियाने या साठी आर्थिक सहाय्य केले आहे. विशेष म्हणजे अशा प्रकारे NSQF अंतर्गत MSFC लेवल १ ते लेवल ४(९ वी ते १२ वी) पूर्ण केलेल्या देशातील या पहिल्या शाळा व पहिले विद्यार्थी ठरले आहेत. हा संपुर्ण उपक्रम यशस्वी होण्याकरिता पुणे महानगरपालिका, राष्ट्रीय माध्यमिक शिक्षा अभियान यांनी महत्वाच्या भूमिका बजावल्या यासाठी सर्वांचे मनपुर्वक आभार. यांच्याकडून मोलाचे सहकार्य मिळाले.

विद्यार्थ्यांच्या प्रतिक्रिया-

मी मल्टी स्किल मध्ये इ. ११ वी व १२ वी साठी फॅब्रीकेशन टेक्निशियन हा विषय घेतला आणि 80 तासांची इंटर्नशिप सुयोग इंडस्ट्री मध्ये पूर्ण केली. या कंपनीमध्ये CNC मशीन चालवणे आणि गाडीचे पार्ट बनविणे अशा कामांचा थेट अनुभव मिळाला. या अनुभवाच्या जोरावर मला याच कंपनीमध्ये नोकरीदेखील मिळाली. स्वत:च्या पायावर उभा राहिल्याने स्वत:बद्दल खूप चांगलं वाटतंय.
वैष्णवी लोंढे (फॅब्रीकेशन टेक्निशियन, कै. नानासाहेब परुळेकर महाविद्यालय पुणे)