बोगस नंबर टाकून प्रवाशांची ने-आण करणारी बस जप्त

औरंंगाबाद : शहरात दुचाकी, चारचाकी चोऱ्यांचे सत्र सुरू असतानाच एका चालकाने बसवर बोगस नंबर टाकून प्रवाशांची ने-आण करण्याचा गोरखधंदा सुरू केला होता. गुन्हे शाखेच्या पथकाने सोमवारी दुपारी छावणी येथील होलीक्रॉस शाळेजवळून ही बस ताब्यात घेवून तिघांवर छावणी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला.

गुन्हे शाखेचे सहायक निरीक्षक अजबसिंग जारवाल यांनी सांगितले की, होलीक्रॉस शाळेसमोर एक खासगी ट्रॅव्हल बस क्रमांक (एमएच-१७-एजी-०१११) उभी दिसली. तेथील लोकांना बसबाबत विचारपूस केली असता राजेश रविकांत रानडे (वय ३४, शांतीपुरा) याने ही बस त्याच्या ओळखीच्या शकील याच्यामार्फत शोहेबभाई (रा. अहमदनगर) याच्याकडून तीन हजार रुपये रोजाने प्रवासी वाहतुकीसाठी घेतल्याचे सांगितले.

रानडेला बसच्या कागदपत्रांविषयी विचारणा केली असता त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यामुळे पोलिसांचा संशय बळावला. बसचे इंजिन आणि चेसिस क्रमांक पडताळून पाहिला असता बस क्रमांक वेगळा असल्याचे निष्पन्न झाले. बसचा मूळ क्रमांक (एमएच-४६-जे-७७७२) हा असून त्यावर टाकलेला क्रमांक जळगाव येथील एका खासगी ट्रॅव्हल बसचा आहे. याप्रकरणी गुन्हे शाखेने राजेश रानडे, शकील आणि शोहेब यांच्याविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करून आठ लाखांची ट्रॅव्हल बस जप्त केली.

महत्त्वाच्या बातम्या

IMP