पुण्यातील बस आगार हाउसफुल, रात्रीच्या वेळी शेकडो पीएमपी बस रस्त्यावर

bad condition of pmt buses pune

टीम महाराष्ट्र देशा : पुण्यातील पीएमपीच्या बसेसमध्ये वाढ झाल्याने बस पार्किंगचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. बस आगारांमध्ये जागा नसल्याने बहुतांशी बस या रस्त्यावर उभ्या केल्या जात आहेत. प्रशासनाकडून मागील अनेक वर्षांपासून दोन्ही महापालिकांकडे जागेची मागणी केली जात आहे. पण या आवाहनाला पालिकांकडून कोणताच प्रतिसाद मिळत नसल्याचं पीएमपीकडून सांगण्यात येत आहे.

‘पीएमपी’च्या मालकीच्या सध्या सुमारे १६२५ बस आहेत. या सर्व बस १३ आगारांमध्ये विभागण्यात आल्या आहेत. सर्वाधिक १९७ बस न.ता.वाडी आगारामध्ये तर सर्वात कमी ७१ बस भोसरी आगारामध्ये आहेत. याच भोसरी आगारामध्ये जागा नसल्याने २४ मिडी बस शेवाळवाडी आगारामध्ये लावण्यात आल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली होती.

न.ता.वाडी व भोसरीसह स्वारगेट, कात्रज, कोथरुड, पुणे स्टेशन, मार्केटयार्ड, निगडी, बालेवाडी, पिंपरी या आगारांमधील बसच्या तुलनेत जागा अपुरी आहे. रात्री बस संचलन थांबल्यानंतर पहाटेपर्यंत या सर्व बस आगारांमध्ये पार्किंगसाठी जातात. पण सर्वच बस आगारात उभ्या केल्या जात नाही. अनेक बस रस्त्यांवरच थांबवाव्या लागत आहेत.

याबाबत पीएमपी संचालक अजय चारठणकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, ‘पीएमपी’ला जागेची गरज आहे, हे खरे आहे. काही आगारांमध्ये बस उभ्या करायलाही जागा नाही. त्यासाठी दोन्ही महापालिकांकडे पाठपुरावा सुरू आहे. वाघोली, बाणेर, रावेत, मोशी,कोंढवा आदी भागातील जागा मिळण्याची मागणी आहे. त्यातील काही जागा पुढील काही दिवसांत मिळण्याची आशा आहे.

दरम्यान मागील काही वर्षांपासून ‘पीएमपी’ची ही अवस्था असली तरी त्याकडे फारसे गांभीर्याने पाहिले गेले नाही, असे दिसते. नवीन तीन आगार सुरू करण्यात आले मात्र, दोन वर्षांपासून ताफ्यात ६०० हून अधिक नवीन बस दाखल झाल्या. पुढील काही दिवसांत त्यात आणखी बसची भर पडणार आहे. बस वाढल्या तरी त्या उभ्या करण्यासाठी आवश्यक जागा मात्र वाढली नाही. यावर मात करण्यासाठी पीएमपी प्रशासनाकडून पुणे व पिंपरी चिंचवड महापालिकेकडे जागा देण्याची सातत्याने मागणी केली जात आहे.

महत्वाच्या बातम्या