जडेजा-विहारी नंतर आता बुमराह चौथ्या कसोटीला मुकण्याची शक्यता?

bumrah

ऑस्ट्रेलिया : भारतीय क्रिकेट संघ सध्या ऑस्ट्रेलिया विरुद्ध कसोटी मालिका खेळत आहे. या मालिकेदरम्यान भारतीय संघाला दुखापतींनी सतावले आहे. भारतीय संघातील अर्धाहून अधिक खेळाडूंना दुखापती झाल्या असून रोज यात नवीन भर पडत आहे. एका पाठोपाठ टीम इंडियाला धक्का बसत आहे. दुखापतग्रस्त रवींद्र जाडेजा यापूर्वीच या कसोटी सामन्याला मुकणार असल्याचे जाहीर करण्यात आले होते. त्यातच आता अजून एक फलंदाज ब्रिस्बेन कसोटी सामन्याला मुकणार असल्याची माहिती मिळाली आहे. सिडनी कसोटी सामन्यात हनुमा विहारी मांडीचे स्नायू दुखावल्यामुळे चौथा कसोटी सामना खेळू शकणार नाही, तसेच आगामी इंग्लंड दौऱ्यातील पहिल्या दोन कसोटी सामन्यांमध्येदेखील विहारी खेळण्याची शक्यता कमी असल्याचे बोलले जात आहे.

त्यातच आता भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहची चौथा कसोटी सामना खेळण्याची शक्यता कमी आहे. त्याच्या ओटीपोटात ताण आल्याने तो ऑस्ट्रेलियाविरुद्ध ब्रिस्बेन येथे होणाऱ्या चौथ्या कसोटी सामन्याला मुकणार असल्याचे वृत्त समोर येत आहे. त्यामुळे भारतीय संघाला बसलेला हा मोठा धक्का मानला जात आहे. कारण याआधीच भारताचे अनेक प्रमुख खेळाडू दुखापतग्रस्त आहेत.

याआधी मोहम्मद शमी, उमेश यादव आणि केएल राहुल हे तिघेही दुखापतीमुळे ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील कसोटी मालिकेतून बाहेर पडले आहेत. शमीला पहिल्या कसोटीत, उमेशला दुसऱ्या कसोटीत दुखापत झाली. तर केएल राहुलला सरावादरम्यान दुखापत झाली. रविंद्र जडेजा आणि हनुमा विहारी हे दोन खेळाडू दुखापतग्रस्त झाले होते. त्यामुळे ते आधीच ब्रिस्बेन कसोटी सामन्यातून बाहेर पडले आहेत. एवढेच नाही तर चालू ऑस्ट्रेलिया दौऱ्यात विहारी, बुमराह किंवा रविंद्र जडेजा दुखापतग्रस्त होणारे पहिले भारतीय खेळाडू नाही.

महत्वाच्या बातम्या