भिवंडीत ४ मजली इमारत कोसळली, दोघांचा मृत्यू तर अनेकजण जखमी

टीम महाराष्ट्र देशा : भिवंडीच्या शांतीनगर परिसरात शुक्रवारी रात्री चार मजली इमारत कोसळली आहे. या घटनेत दोन जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच पाच जण जखमी झाले असून अनेक जण ढिगाऱ्याखाली अडकले असल्याची माहिती आहे. तसेच परिसरामध्ये बचावकार्य सुरु आहे.

मिळालेल्या माहितीनुसार इमारतीला शुक्रवारी रात्री ११ वाजताच्या सुमारास तडे पडण्यास सुरवात झाली होती. त्यामुळे रहिवाशांनी महानगरपालिकेच्या आपत्कालीन कक्षाला याबाबत माहिती दिली. नागरिकांच्या तक्रारीनंतर आपत्कालीन कक्ष, अग्निशामक दल जवानांसह शांतीनगर पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. इमारतीमधील कुटुंबियांना घराबाहेर काढण्यात येत असतानाच मध्यरात्री दीड वाजण्याच्या सुमारास इमारत कोसळली.

तसेचं प्राथमिक माहितीनुसार दुर्घटनाग्रस्त इमारीत ८ वर्ष जुनी आणि बेकायदेशीर होती. परंतु ही धोकादायक अवस्थेत असल्यानं संपूर्ण इमारत रिकामी करण्यात आली होती. तरीही काही लोक परवानगीशिवाय इमारतीत वास्तव्यास होते अशी माहिती आहे. दरम्यान या घटनेतील जखमींवर इंदिरा गांधी शासकीय रुग्णालयात उपचार सुरु आहेत.