निवडणुकीच्या निकालापूर्वीच सपा-बसपा युती तोडून एकमेकांवर हल्ले करणार : योगी आदित्यनाथ

YOGI_Adityanath

टीम महाराष्ट्र देशा : लोकसभा निवडणुकीचा निकाल लागण्यापूर्वीच सपा आणि बसपा युती तुटणार असल्याचा विश्वसनीय दावा उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी केला आहे. आदित्यनाथ प्रसारमाध्यमांशी बोलत होते. यावेळी आदित्यनाथ यांनी बसपा आणि सपाच्या युतीवर भाष्य केले.

यावेळी आदित्यनाथ म्हणाले की, येत्या २३ तारखेला लागणाऱ्या लोकसभा निवडणुकीच्या निकाला अगोदरच मायावती आणि अखिलेश यादव युती तोडणार असून हे ‘आत्या – भाचे’ एकमेकांवर पुन्हा शाब्दिक हल्ले चढवणार आहेत. तसेच या लोकसभा निवडणुकीत भाजपला उत्तर प्रदेश मधून २०१४ सारखे घवघवीत यश मिळणार आहे. त्यामुळे बसपा आणि सपाच्या युतीचा भाजपवर कोणताच परिणाम होणार नसल्याचे त्यांनी यावेळी अप्रत्यक्षरित्या स्पष्ट केले.

दरम्यान, या लोकसभा निवडणुकीत उत्तर प्रदेशमध्ये भाजपला धुळीत मिळवण्यासाठी सपा आणि बसपा ने एकत्र येत निवडणुकीचे रणशिंग फुंकले. त्यामुळे मायावती आणि अखीलेशच्या युतीचा परिणाम भाजपला होणार असल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. तर दुसरीकडे सपा आणि बसपाची युती ही अघोरी युती असल्याचं भाजपकडून सांगितल जात आहे. त्यामुळे ही युती दीर्घकाळ टिकणार नसून थोड्याच कालावधीत तुटणार असल्याच भाजप नेत्यांकडून सांगण्यात येत आहे.