कॉंग्रेससाठी मोठा दिलासा, सहा आमदारांनी केला पक्षात प्रवेश

टीम महाराष्ट्र देशा : लोकसभा निवडणुकीत झालेल्या पडझडीमुळे देशभरात कॉंग्रेसला एक एक नेता सोडून जात आहे. कर्नाटकमध्ये आमदारांनी बंडखोरी केल्यामुळे कॉंग्रेसला सत्ता गमवावी लागली आहे. तर महाराष्ट्रात देखील विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर कॉंग्रसला गळती लागली आहे.

राजस्थानमध्ये मात्र कॉंग्रेसला दिलासा मिळाला आहे. बहुजन समाज पार्टीच्या राज्यातील सहाही आमदारांनी कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. त्यामुळे राजस्थानमध्ये मायावतींना मोठा धक्का बसला आहे. या सर्व आमदारांनी सत्ताधारी काँग्रेसला बाहेरुन समर्थन पाठींबा दिला होता. आता थेट काँग्रेसमध्येचं प्रवेश केला आहे.

बहुजन समाज पक्षाचे उदयपूरवाटी मतदार संघाचे आमदार राजेंद्र गुढा, नदबई मतदार संघाचे आमदार जोगेंद्र सिंह अवाना, नगर मतदार संघाचे आमदार वाजिब अली, करोली मतदार संघाचे आमदार लाखन सिंह मीणा, तिजारा विधासभा मतदार संघाचे आमदार संदीप यादव आणि आमदार दीपचंद खेरिया यांनी बसपाला राजीनामा देत काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे.

२०० जागा असलेल्या राजस्थान विधानसभेत काँग्रेसचे १०० आमदार, मित्र पक्ष राष्ट्रीय लोकदलाचा एक आमदार. तर १२ अपक्ष आमदारांचे कॉंग्रेसला बाहेरुन समर्थन मिळत आहे.