अहमदनगर : बसपाने केली ‘त्या’ नगरसेवकांची हकालपट्टी , राष्ट्रवादीच्या कारवाईची प्रतिक्षाच

टीम महाराष्ट्र देशा : अहमदनगर महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीला मतदान केल्याप्रकरणी बसपाच्या चार नगरसेवकांना पक्षविरोधी कारवाई केली म्हणून निलंबित केले आहे. बसपाचे महाराष्ट्र राज्याचे प्रदेशाध्यक्ष सुरेश साखरे यांनी ही माहिती दिली. महानगरपालिकेच्या निवडणूकीत प्रथमच बसपाने आपले उमेदवार उभे केले होते व ते उमेदवार निवडूनही आले होते. मात्र आता त्या नगरसेवकांवर कारवाई झाल्याने खळबळ उडाली आहे.

नगर महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये प्रभाग क्रमांक 10व मधून बसपाचे चार उमेदवार विजयी झाले होते. यामध्ये प्रभाग क्रमांक 10अ मधून अक्षय उनवणे, 10 ब मधून अश्‍विनी सचिन जाधव, 10 क मधून अनिता पंजाबी ,तर 10 ड मुदस्सर शेख यांचा समावेश आहे. महानगरपालिकेच्या महापौर व उपमहापौर पदाच्या निवडणुकीमध्ये अनेक राजकीय घडामोडी घडल्या. राष्ट्रवादीच्या 18 नगरसेवकांनी पक्षाविरोधात जाऊन भाजपला जाहीर पाठींबा दिला. त्यांच्या समवेत बसपाच्या चार नगरसेवकांनी देखील भाजपाला पाठिंबा दिला होता. मतदान करताना या सर्व नगरसेवकांनी हात उंचावून भाजपला मत असल्याचे जाहीर केले.

बहुजन समाज पार्टीने याची गांभीर्याने दखल घेतली असून निवडून आलेल्या चार नगरसेवकांची हकालपट्टी करण्याचा निर्णय घेतला आहे. ‘स्वतःच्या स्वार्थासाठी पक्षाच्या विरोधात मतदान करून भाजपला साथ दिली म्हणून त्यांच्यावर कारवाई करण्यात आली’, असे महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष सुरेश साखरे यांनी आज स्पष्ट केले आहे. या घटनेने नगरच्या राजकीय वर्तुळात मात्र खळबळ उडाली आहे.

मात्र , राष्ट्रवादी काँग्रेसने पक्ष आदेश डावलल्याने 18 नगरसेवकांनी फक्त नोटीस देऊन शांत बसनेच पसंत केले आहे. एरव्ही राष्ट्रवादीच्या पक्ष संघटनेत अग्रस्थानी असणारे अजित पवार देखील याप्रकरणी कमालीची शांतता बाळगून असल्याने त्यांची याला मूकसंमती आहे का ? असा प्रश्न निर्माण होत आहे. तर खुद्द शरद पवारांच्या आदेशाला केराची टोपली दाखवणाऱ्या नगरसेवकांवर कधी कारवाई होणार याकडे सगळ्या राज्याचे लक्ष लागले आहे

You might also like
Comments
Loading...