बीएसएनएल कामगारांनी घेतली खा. विनायक राऊत यांची भेट

मोठ्या प्रमाणात कंत्राटी कामगारांना कमी केल्याने मोबाईल टॉवर, मोबाईल सेवा, लँडलाईन कनेक्शनची सेवा विस्कळीत होऊ लागली आहे

सिंधुदुर्ग : बीएसएनएलच्या कंत्राटी कामगारांचा सहा महिन्यांचा पगार व ईपीएफ न मिळाल्याने कर्मचारी वास्को-गोवा येथील कामगार अधिकारी यांच्याकडे गेल्याच्या रागातून अधिकाऱ्यांनीच कर्मचाऱ्यांना कामावरुन कमी केले, असा आरोप कंत्राटी कामगारांनी करून याकडे खासदार विनायक राऊत यांचे लक्ष वेधले.आपण याबाबत सी. जी. एम. कार्यालयाशी बोलून तुम्हाला न्याय मिळवून देईन, असे आश्वासन राऊत यांनी दिले.

bagdure

दरम्यान, मोठ्या प्रमाणात कंत्राटी कामगारांना कमी केल्याने मोबाईल टॉवर, मोबाईल सेवा, लँडलाईन कनेक्शनची सेवा विस्कळीत होऊ लागली आहे. बीएसएनएलच्या सत्तर टक्के कंत्राटी कामगारांना अधिका-यांनी तुम्ही कामावर येऊ नका, असे सांगत सेवेतून दूर केल्याचे पुढे येत आहे. त्या विरोधात कामगार एकवटले आहेत. त्यांनी खासदार राऊत यांची भेट घेऊन आपले गा-हाणे मांडत निवेदनही सादर केले.

शिवसेनेचे गटनेते नागेंद्र परब उपस्थित होते. महिन्यापूर्वीच डी. एम. कंपनीने आमचे अर्ज भरुन घेतले. मात्र, आता अधिका-यांनीच आपण कामगार अधिका-यांकडे गेल्याच्या रागातून आपणास कमी करण्याचे कटकारस्थान केल्याचे त्यांनी सांगितले. यापूर्वी पगार न दिल्याने पावसाळय़ात आपण कर्मचा-यांनी कामावर जाणे बंद केले होते. त्यावेळी पावसाळा असल्याने गडगडाटामुळे सेवा बंद पडत असल्याने अधिकाऱयांनी मध्यस्थी करून कामावर हजर होण्यासाठी प्रयत्न केले. आता मात्र अधिका-यांनी कर्मचा-यांना वा-यावर सोडले आहे, अशी खंत व्यक्त करण्यात येत आहे.कंत्राटी कामगारांना अचानक कमी केल्याने काही सेवांवर परिणाम होऊ लागला आहे. आज सकाळी कॉलही होत नव्हते. टॉवर सेवाही बंद पडली होती. मुंबई-गोवा महामार्गाचे काम सुरू असताना अनेक लँडलाईन बंद पडले. ते अद्याप बंदच आहेत.

You might also like
Comments
Loading...