समतेला मोडीत काढणारे जगातील संपत्तीचे क्रूर केंद्रीकरण

Brutal centralization of the world's wealth

प्रा. डॉ.सुधीर गव्हाणे – गेल्या तीस वर्षांमध्ये सारेजग प्रगती करते आहे व भारतही प्रगती करतो आहे हे जितके दृश्य रूपात आपणास दिसते आहे तितकेच त्या प्रगतीचे अंतरंग तपासणेही आवश्यक आहे. झालेली प्रगती कुणाच्या घरी आणि किती पाणी भरतेय हे समजून घेणे गरजेचं आहे. या प्रगतीची लाभ कुणी आणि कशा प्रमाणात चाखले आणि गोरगरीबांच्या वाट्याला काय आले हेही जाणणे महत्वाचे आहे. लोकशाही असणारी आपली व्यवस्था समाजातील उपेक्षित वर्गासाठी संधी देते का ? मोठा चिंताजनक प्रश्न आहे. आपण हे मानलेच पाहिजे की, भारत स्वतंत्र झाल्यानंतर व प्रजासत्ताक पध्दती आपण डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या मौलिक योगदानानं बनलेल्या आदर्श घटनेनुसार स्विकारल्यानंतर व पंडित नेहरूंसारख्या अनेकांचे प्रगत नेतृत्व लाभल्याने देशातील महिला आणि गोरगरीब , शेतकरी , दलित , वंचित यांच्या कुटूंबातील लक्षावधींच्या जीवनात परिवर्तन आले आहे. समाजातील अनेक क्षेत्रात प्रथमच त्यांनी प्रवेश करून आपला ठसा उमटवलाय , देशाच्या प्रगतीत योगदान दिले आहे. लक्षावधींच्या जीवनात लोकशाहीने व स्वातंत्र्याने स्वाभिमान पेरला आहे व नवी संधा देऊन पारंपरिक व्यवसायाऐवजी नवा मार्ग दिला आहे . हा बदल खचितच आनंददायक आहे. हे मान्य केल्यावरही एक सवाल उभा राहतों तो हा की , आपण राजकीय समता तर गाठली , मग आर्थिक व सामाजिक समतेचे काय ? याला डॉ. आंबेडकर यांनी आर्थिक व सामाजिक लोकशाही म्हटलं आहे. त्याचं काय ? सर्व जगात विषमतेचं चित्र काय आहे ? भारताचं चित्र काय आहे ? आपण कोणत्या दिशेने वाटचाल करतो आहोत ?
अलीकडेच प्रकाशित झालेला ऑक्सफॉम या जगप्रसिद्ध धर्मादाय संस्थेचा अभ्यास काही धक्कादायक सत्य सांगणारा आहे.
ऑक्सफॉमचा जगातील आर्थिक विषमतेविषयीचा २०१५ साली प्रकाशित अहवाल जगातील मुठभर माणसांकडे संपत्तीचे केंद्रीकरण गेल्या तीस वर्षांमध्ये वेगाने होत असल्याचे सांगतो. जगातील सर्वात श्रीमंत असणारी धनाढ़्य माणसे ज्याला ” हाय नेट वर्थ इंडीव्ह्यजुल्स “( एचएनडब्ल्यूइ) असं म्हटलं जातं. ही माणसे म्हणजे सर्वाधिक संपत्ती धारण करणारी वा असणारी माणसे आहेत. जगाची एकूण लोकसंख्या ७३० कोटी आहे व त्यातील या अतिसंपत्तीवान मुठभरांची संख्या २००९ मध्ये अवधी एक कोटी होती. ती २०१४ मध्ये वाढून १ कोटी ३७ लाख झाली आहे. या फक्त १% लोकांकडे जगातील ५०% नागरिकांएवढी संपत्ती आहे. जगातील मंदीच्या मंदीच्या पलीकडील बिलीनियर्स बूम
त्यातीलही अतिअतिधनाढ्य (डॉलर बिलीनियर्स ) म्हणजे सोप्या भाषेत श्रीमंतातील अतिश्रीमंत म्हणता येतील अशांची जगातील संख्या किती आहे ? जगाच्या ७३० कोटी माणसांपैकी ही अवघी १६४५ , म्हणजेच ही मुठभर अब्जाधीश माणसे दिवसेंदिवस अधिकाधिक प्रमाणात आर्थिकदृष्ट्या संपन्न होत चालले आहेत. हा अहवाल सांगतो की , जगातील अवघ्या ८५ धनाढ़्यातील धनाढ्य माणसांकडे जगाच्या गरीबातील ग़रीब ५०% माणसांएवढी संपत्ती आहे. आपला भारतही यात मागे नाही. भारतात १९९० च्या दरम्यान अवघे दोन जण बिलीनियर्स ( अब्जाधीश )अतिधनाढ्य होते व २०१४ मध्ये त्यांची संख्या झपाट्याने वाढून ६५ वर पोहचलीय. सर्वत्र आर्थिक मंदी असताना
ही अधिकाधिक धनाढ़्य कशी बनत जातात हे मोठे गूढच आहे. भारतातील १% श्रीमंतांकडे देशातील ५७% नागरिकांच्याएवढी संपत्ती आहे.

लेखक-  PROF. DR. SUDHIR GAVHANE, Media& Higher Education Expert , Retired University teacher with 34 years experience at BAMU AURANGABAD [MAHARASHTRA] INDIA. Now Dean at MIT-WPU Pune.