उत्तर प्रदेश : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्यावरून आता मोठे वादंग निर्माण झाले आहे. राज ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र तसेच उत्तर प्रदेशसह उत्तरेतील राज्यांमध्ये राजकीय वातावरण ढवळून निघत आहे. उत्तरप्रदेश मधील गोंडा येथील भाजप खासदार बृजभूषण सिंग यांनी राज ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्याला कडाडून विरोध केला आहे. जोपर्यंत राज ठाकरे उत्तर भारतीयांची माफी मागणार नाहीत तोपर्यंत त्यांना अयोध्येत पाय ठेवू देणार नाही, असा इशारा दिला आहे. बृजभूषण सिंग उत्तर प्रदेशातील अनेक जिल्ह्यांमध्ये दौरा करत राज ठाकरे यांच्या विरोधासाठी जनसमर्थन मिळवत आहेत.
भाजप नेते बृजभूषण सिंग म्हणाले की, “केवळ पाप करणारा पापात भागीदार नसतो, जो सक्षम असताना देखील समोर पाप घडताना पाहतो, पण रोखण्याचा प्रयत्न करत नाही तो देखील पापात भागीदार असतो. भाजपची राज ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्याबाबत असलेली भूमिका काय आहे, ते मला माहीत नाही, हा माझा वैयक्तिक मुद्दा आहे आणि व्यक्तिगत आंदोलन आहे. अयोध्या सगळ्यांची आहे, सगळ्याना येथे येण्याचा अधिकार आहे, पण राज ठाकरे माफी न मागता अयोध्येत दाखल झाले तर त्यांच्या विरोध करणार. राज ठाकरेंना उत्तर प्रदेशच्या भूमीवर पाय देखील ठेवू देणार नाही. बृजभूषण सिंग यांनी आधीच हे जाहीर केल होते.
दरम्यान आजही बृजभूषण यांनी राज ठाकरेंना आपला विरोध कायम असल्याचे स्पष्ट केले आहे. “ही तुमची राजकीय भेट आहे, धार्मिक भेट नाही,असे राज ठाकरेंना त्यांनी पुन्हा एकदा सुनावले. हेच राज ठाकरे सहा महिन्यापुर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि योगी यांच्यावर टीका करत होते. देशाचा नेता बनायचे असेल तर बना, पण ज्यांना त्रास दिला आहे, त्यांची माफी मागा, असे बृजभूषण म्हणाले.
बृजभूषण यांनी यावेळी सांगितले की, अयोध्या येथे साधुसंताची बैठक बोलवली आहे, त्यामध्ये सर्व संताची जवळपास एक लाखांची गर्दी जमली, त्या बैठकीत जोपर्यंत ते माफी मागत नाहीत तो पर्यंत त्यांना अयोध्येत पाय ठेवू न देण्याचा निर्णय घेण्यात आला.
महत्त्वाच्या बातम्या :