‘अडाणी’ रजनीकांत यांना फक्त माध्यमांनी मोठे केले-स्वामी

swami

टीम महाराष्ट्र देशा- सुपरस्टार रजनीकांत यांनी राजकीय पक्षाची घोषणा करत त्यांनी आपला राजकारणातील प्रवेश निश्चित केला. मात्र भाजप नेते सुब्रमण्यम स्वामी यांनी रजनीकांत यांच्या राजकीय प्रवेशानंतर टीका केली आहे. एकीकडे रजनीकांत यांच्या राजकीय प्रवेशाची सर्वत्र चर्चा होता असताना, ही फक्त माध्यमांनी दिलेली हवा असल्याचे वक्तव्य सुब्रमण्यम स्वामी यांनी केलं आहे.

रजनीकांत यांच्या राजकारणातील प्रवेशाविषयी ‘एएनआय’ या वृत्तसंस्थेशी संवाद साधताना स्वामी यांनी आपले मत मांडले. ‘त्यांनी फक्त राजकीय प्रवेशाची घोषणा केली आहे. त्याविषयी कोणतीच विस्तारित माहिती किंवा कागदपत्र सादर केले नाहीत. ते अशिक्षित आहेत. किंबहुना माध्यमांनी उगाचच हवा देऊन त्यांना मोठे केले आहे’, असे ते म्हणाले. तामिळनाडूची जनता चाणाक्ष असून, त्यांना हे सर्व लक्षात येईलच असेही त्यांनी स्पष्ट केले. राजकारणात प्रवेश करताच क्षणी रजनीकांत यांच्याविषयी अशी वक्तव्ये पाहता सध्या बऱ्याच चर्चा रंगल्याचे दिसते आहे.

एकीकडे रजनीकांत यांच्यावर टीका होत असताना, त्यांच्या चाहत्यांमध्ये मात्र उत्साहाचं वातावरण आहे. राजकीय पक्षाची स्थापना करून तमीळनाडूतील आगामी विधानसभा निवडणुकीत २३४ जागांसाठी लढणार असल्याचं रजनीकांत यांनी स्पष्ट केलं. ‘नेते राजकारणाच्या नावावर आपला पैसा लुटत आहेत आणि त्यामुळेच आता इथल्या राजकारणाची व्यवस्था बदलणं गरजेचं आहे. आज भ्रष्टाचाराने सगळी व्यवस्था पोखरली गेली आहे आणि राजकारण फक्त एक देखावा उरला आहे. म्हणूनच जेव्हा कधी सत्तेचा दुरुपयोग केला जाईल, तेव्हा त्याविरोधात मी नेहमीच लढत राहीन.’ असं रजनीकांत यांनी म्हटलं आहे.