प्रशांत किशोर-मोदी भेट: 2019 च्या निवडणुकीत प्रशांत किशोर पुन्हा भाजपसोबत ?

-Prashant-Kishor-Narendra-Modi

नवी दिल्ली : २०१९ मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकीत प्रशांत किशोर आणि पंतप्रधान मोदी यांची जोडी पुन्हा एकत्र येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. हिंदुस्थान टाइम्सच्या वृत्तानुसार, दोघांचीही नुकतीच भेट असून, आगामी लोकसभा निवडणुकीतील किशोर यांच्या भूमिकेबाबत चर्चा झाल्याची माहिती मिळत आहे. दोन्ही दिग्गजांमध्ये थेट संवाद सुरु असून, यात आगामी लोकसभा निवडणुकीसाठी प्रशांत किशोर मोदी टीममध्ये सहभागी झाल्यास, त्यांच्यावर काय जबाबदारी असेल, यावर चर्चा झाल्याचे समजते.

कोण आहेत प्रशांत किशोर?

*37 वर्षीय प्रशांत किशोर हे उत्तर प्रदेशच्या बलियाचे रहिवाशी.

* संयुक्त राष्ट्राच्या ‘हेल्थ मिशन’ दक्षिण आफ्रिकेतील प्रमुख म्हणून काम.

* मोदींच्या प्रचारासाठी आफ्रिकेतील नोकरी सोडून आले होते.

* देशातील राजकारण आणि निवडणुकांत काम करण्यासाठी सिटीझन्स फॉर अकाऊंटेबल गव्हर्नन्स अर्थात CAG कंपनीची स्थापना

* या कंपनीद्वारे दिग्गजांच्या प्रचाराची धुरा हाती घेतली.

* ‘अब की बार मोदी सरकार’ ही प्रशांत किशोर यांच्या टीमचीच घोषणा

प्रशांत किशोर यांचा निवडणुकांसाठी रणनीती आखण्यात हातखंडा आहे. सोशल मिडियाचा अत्यंत प्रभावीपणे वापर ते करतात . 2012 ची गुजरात विधानसभा निवडणूक आणि त्यानंतर 2014 च्या लोकसभा निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या विजयात त्यांचा मोठा वाटा होता. त्यामुळे या लोकसभा निवडणुकीनंतर त्यांच्या नावाची सर्वत्र चर्चा सुरु झाली. पण काही कारणांमुळे या मोदी आणि किशोर यांच्यात अंतर वाढले. त्यानंतर प्रशांत किशोर यांनी 2015 मधील बिहार विधानसभा निवडणुकीत मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्यासाठी काम करत होते. तर गेल्या वर्षी झालेल्या पंजाबच्या विधानसभा निवडणुकीत कॅप्टन अमरिंदर सिंह यांच्यासाठी रणनिती तयार केली होती. त्यातून काँग्रेसला चांगला फायदा झाला होता.

सूत्रांच्या माहितीनुसार, प्रशांत किशोर आणि नरेंद्र मोदी गेल्या सहा महिन्यांपासून संपर्कात आहेत. त्यामुळे 2019 च्या लोकसभा निवडणुकीसाठी प्रशांत किशोर टीम मोदीमध्ये सहभागी झाल्यास, निवडणुकीच्या प्रचाराच्या रणधुमाळीत पंतप्रधान मोदींच्या रथाचे सारथ्य प्रशांत किशोर करु शकतात.असं जरी असलं तरीही हिंदुस्थान टाईम्सच्या वृत्तानुसार, मोदी आणि किशोर या दोघांमधील बैठकीत कोणताही अंतिम निर्णय झालेला नाही.