सोलापूरमध्ये राष्ट्रवादीला झटका; जिल्हा बँकेचे संचालक मंडळ बरखास्त

सोलापूर: राजकीय नेते आणि कार्यकर्त्यांच्या तावडीत सापडलेल्या सोलापूर जिल्हा  बँकेचे संचालक मंडळ अखेर बरखास्त करण्यात आले आहे. तारण मालमत्तेपेक्षा अधिक कर्जवाटप तसेच थकबाकीची वसुली न करणे आदींसह इतर अनेक कारणांमुळं संचालक मंडळ बरखास्त करण्याचे आदेश राज्य सरकारकडून देण्यात आले आहेत.

रिझर्व्ह बँकेच्या आदेशानुसार सरकारकडून कारवाई करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान, राज्य सरकारकडून घेण्यात आलेल्या निर्णयामुळे राष्ट्रवादी काँग्रेसला जोरदार झटका बसल्याचे दिसत आहे.

गेली अनेक वर्षांपासून जिल्हा बँकेवर राष्ट्रवादी काँग्रेसचे वर्चस्व आहे. काही दिवसांपूर्वी बड्या नेत्यांच्या कारखान्यांना देण्यात आलेले कर्ज वसूल करण्यात बँकेला अपयश आल्याच उघड झाले होते , तसेच बँकेच्या संचालकांनी तारण मालमत्तेपेक्षा अधिक कर्जवाटप केल्याने नाबार्डने देखील नाराजी व्यक्त करत कारभार सुधारण्यास सांगितले होते.

माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते-पाटील, माजी मंत्री आमदार दिलीप सोपल, सिद्धाराम म्हेत्रे, बबनराव शिंदे आदी दिग्गज नेते संचालक असलेल्या सोलापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक मंडळ रिझर्व्ह बँकेने बरखास्त केले आहे. मागील काही वर्षांपूर्वी बँकेच्या तत्कालीन सभापतींसह संचालकांनी तारण मालमत्तेपेक्षा अधिक कर्जवाटप केले. तसेच बँकेच्या कामकाजात सुधारणा झाली नाही. जिल्ह्यातील नेत्यांचे कारखाने व संस्थांकडे सुमारे ६५० कोटींची थकबाकी आहे. त्यामुळे बँकेचा एनपीए वाढला. नाबार्डने वारंवार सूचना देऊनही या थकीत कर्जाची वसुली करण्यात आली नाही. अखेर रिझर्व्ह बँकेच्या शिफारशीनंतर शासनाने सहकार खात्याच्या कलम ११० अ अन्वये संचालक मंडळ बरखास्त केले.

दरम्यान, नाबार्डने फटकरल्यानंतरही कारभारात सुधारणा झालीच नाही उलटपक्षी बँकेला थकबाकी वसुली देखील करता येत नाहीये. या सर्व बाबींचा विचार करता सहकार कायद्यातील कलम ११० अ अंतर्गत संचालक मंडळ बरखास्त करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे जिल्हा बँकेवर आता प्रशासकाची नियुक्त करण्यात आली असून, सोलापूरचे उपनिबंधक अविनाश देशमुख यांनी आज कार्यभार स्वीकारला.