पवारांच्या आशीर्वादाने बॉल टॅम्परिंगप्रकरणातील दोषी स्मिथ आणि वॉर्नर आयपीएलमध्ये खेळणार

blank

टीम महाराष्ट्र देशा- मुंबई- बॉल टेम्पर करून क्रिकेटच्या मूल्यांना काळिमा फासण्याचे काम करणाऱ्या स्टीव्हन स्मिथ आणि डेव्हिड वॉर्नर यांना बीसीसीआय चे माजी अध्यक्ष शरद पवार यांच्या आशीर्वादाने आपीएल मध्ये खेळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. विशेष म्हणजे त्यांच्याच देशात या दोघांवर क्रिकेट ऑस्ट्रेलियाने एका वर्षाची बंदी घातली आहे.

केप टाऊन येथील दक्षिण आफ्रिकेविरूद्धच्या तिस-या कसोटी सामन्यादरम्यान ऑस्ट्रेलियाचा कॅमेरून बेनक्रॉफ्ट हा क्षेत्ररक्षक चेंडू एका पिवळसर वस्तूवर घासत असल्याचे चित्रिकरणात स्पष्ट दिसले होते. धक्कादायक म्हणजे या घटनेनंतर ऑस्ट्रेलियाचा कर्णधार स्मिथने प्रसारमाध्यमांसमोर चेंडूशी छेडछाड केल्याचे मान्य केले होते. या प्रकारामुळे क्रिकेट ऑस्ट्रेलियाची प्रतिमा डागाळली आहे. हे प्रकरण समोर आल्यानंतर बीसीसीआयने आयपीएलमध्ये खेळण्यासही मज्जाव केला होता. पण शरद पवार यांच्या मध्यस्थीने स्मिथ आणि वॉर्नर यांच्यासाठी आता आयपीएलचे दरवाजे खुले झाले आहेत, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.

क्रिकेटमधील अनेक दिग्गज मंडळींनी स्मिथ आणि वॉर्नर यांच्यावर टीकेची झोड उठवली होती. या संपू्र्ण प्रकरणावर सचिन तेंडुलकरने आपल्या ट्विटर अकाउंटवरुन आपलं मत व्यक्त केलं आहे. ‘क्रिकेट हा सभ्य गृहस्थांचा खेळ म्हणून ओळखला जातो. हा एक असा खेळ आहे की, जो पारदर्शक पद्धतीने खेळला गेला पाहिजे असं माझं मत आहे. जे काही झालं ते अत्यंत चुकीचं झालं. पण याप्रकरणी जो निर्णय घेण्यात आला आहे तो अतिशय योग्य आहे. विजय हा महत्त्वाचाच असतो. पण तो तुम्ही कशा पद्धतीने मिळवता हे अतिशय महत्त्वाचं असतं.’ असं ट्वीट सचिननं केलं आहे.

चेंडू कुरतडल्याप्रकरणी आॅस्ट्रेलियाने प्रतिष्ठा गमावली आहे. खेळाडूंच्या या कृत्यामुळे देशाने जी पत गमावली त्याची भरपाई होणे कठीण असल्याचे मत माजी फलंदाज मायकेल हसी याने व्यक्त केले.तर ‘ज्याप्रमाणे आपल्या बोर्डाने देशी खेळाडूंवर कठोर कारवाई केली त्याप्रमाणे कठोर कारवाई आंतरराष्ट्रीय खेळाडूंवर झाली पाहिजे. पण मी तर म्हणेन स्मिथवर आजीवन बंदी घातली गेली पाहिजे. फक्त त्याच्यावरच नाही तर त्याच्या सोबत जे कोणी असतील त्यांच्यावर देखील बंदी घातली गेली पाहिजे. आयसीसीकडे पाहिलं तर तुम्हाला दिसून येईल की, आशियाई खेळाडूंवर जास्त कारवाई झाली आहे. पण इंग्लंड,ऑस्ट्रेलिया यांच्यावर फार कारवाई होत नाही. हे बरोबर नाही. पण बॉल टॅम्परिंगमध्ये पाकिस्तान आणि ऑस्ट्रेलियाचे अनेक खेळाडू पुढे असतात. हा फारच गंभीर गुन्हा आहे. जो कोणी दोषी आहे त्याच्यावर आजन्म बंदी घालणं गरजेचं आहे.’ असं संदीप पाटील  म्हणाले.

( आज १ एप्रिल असल्याने नेहमीच ‘सिरिअसली’ बातम्या वाचणाऱ्या वाचकांना हा गोड धक्का देण्याचा छोटासा प्रयत्न. कारण आहे अर्थातच ‘एप्रिल फूल’ चे. सो डोण्ड टेक इट सिरिअसली. बी अ कुल… आणि हो भविष्यात खरोखर असं काही घडलं तर तो योगायोग समजावा)