राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांची हत्या, जनतेचा रोष पाहून राम शिंदेनी काढला पळ

Ram-Shinde-

टीम महाराष्ट्र देशा- नगर जामखेड येथील राष्ट्रवादीच्या दोन कार्यकर्त्यांच्या हत्येच्या घटनेनंतर पालकमंत्री राम शिंदे हे जिल्हा रुग्णालयात दाखल झाले होते. मात्र त्यांना जनतेच्या रोषाला सामोरे जावे लागले. नगर जिल्ह्याचा बिहार झालाय का ,आरोग्याची सुविधा कोलमडली आहे, अशा शब्दात त्यांना जनतेने सुनावले. जनतेचा रोष पाहून राम शिंदेनी पळ काढल्याची माहिती समोर आली आहे.

अहमदनगरमधील शिवसैनिकांचे हत्या प्रकरण ताजे असतानाच आता आणखीन एक खळबळजनक घटना घडली आहे, जामखेडमध्ये योगेश राळेभात आणि राकेश राळेभात या दोन भावांची गोळ्या घालून हत्या करण्यात आली आहे. योगेश राळेभात हा राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष होता.

जामखेडमधील मार्केटयार्ड परिसरात सायंकाळी ६ ते ६:३० च्या दरम्यान हि घटना घडली, दुचाकीवरून आलेल्या दोन अज्ञात हल्लेखोरांनी राळेभात यांच्यावर गोळीबार केला. दोन्ही हल्लेखोरांनी तोंडाला गुंडाळले असल्याने त्यांची ओळख पटली नाही. या हत्याकांड प्रकरणी आज जामखेड बंद पुकारण्यात आला आहे. अंत्यविधीला राष्ट्रवादी काँग्रेसचे अनेक नेते उपस्थिती रहाणार आहेत

दरम्यान, काही दिवसांपूर्वीच केडगावमध्ये दोन शिवसैनिकांची भर दिवसा गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती, त्यानंतर आता राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यासह त्याच्या भावाची हत्या करण्यात आली आहे. त्यामुळे अहमदनगरमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून नगरचा बिहार झालाय का ? असा प्रश्न निर्माण झाला आहे.

या दुर्दैवी घटनेची माहिती कळल्यानंतर शिंदे यांनी तात्काळ जिल्हा रुग्णालय गाठले. मात्र तेथे संतप्त झालेल्या गावकऱ्यांनी शिंदे यांच्यावरच प्रश्नांचा भडिमार केला. जिल्ह्यामध्ये कायदा सुव्यवस्था राहिली आहे का, असा प्रश्न उपस्थित केला. नगरचा बिहार झाला आहे का? जामखेडमध्ये रुग्णालयाची अवस्था काय आहे ती पहा, तेथे यांना उपचार मिळाले नाहीत. याला जबाबदार कोण असा सवालही उपस्थित केला. संतप्त झालेल्या नागरिकांनी राम शिंदे यांना चांगलेच धारेवर धरले. त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न करण्यात आला. पण जनतेचा रोष मोठ्या प्रमाणात असल्यामुळे व कोणीही न ऐकण्याच्या मनस्थितीत असल्याचं पाहत अखेरीस राम शिंदे यांना काढता पाय घ्यावा लागला.