ब्रेकिंग : अन्यथा १ ऑगस्टला जेलभरो आंदोलन; मराठा आंदोलकांचा सरकारला निर्वाणीचा इशारा

टीम महाराष्ट्र देशा : सकल मराठा समजाकडून राज्य सरकारला निर्वाणीचा इशारा आला आहे. दोन दिवसात मराठा आरक्षणाबाबत निर्णय न झाल्यास 1 ऑगस्टला जेलभरो आंदोलन करण्यात येणार आहे. मुंबईत आज सकल मराठा समाजाची महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीत सरकारला हा इशारा देण्यात आला आहे. सरकारकडून मराठा आरक्षणाबाबत चालढकल करण्यात येत असल्याने मराठा समाज आक्रमक बनला आहे.

राज्यभरात सुरु असलेलं मराठा क्रांती मोर्चाचे हे आंदोलन काही ठिकाणी शांततेत सुरु आहे, तर काही ठिकाणी याला हिंसक वळण लागलं आहे. मराठा आरक्षणासाठी बीड जिल्ह्यातील परळीतही १८ जुलैपासून मराठा मोर्चाच्या वतीने ठिय्या आंदोलन सुरु करण्यात आलं, जे अद्याप सुरुच आहे.

मराठा समाजाचा तात्काळ ओबीसी प्रवर्गात समावेश करुन आरक्षण द्या : आ.भुमरे

काय आहेत नेमक्या मराठा समाजाच्या प्रलंबित प्रमुख मागण्या

  • मराठा समाजाला त्वरीत आरक्षण द्यावे.
  • मराठा विद्यार्थ्यांना शिक्षण शुल्कातील ५० टक्के सवलतीची अंमलबजावणी न करणाऱ्या महाविद्यालयांची मान्यता रद्द करा.
  • राज्य सरकारच्या नोकर भरतीत मराठयांसाठी घोषित केलेल्या १६ टक्के आरक्षणाचा सध्या चालू असलेल्या पावसाळी अधिवेशनात अध्यादेश काढून त्यांचे त्वरीत कायद्यात रूपांतरण करावे.
  • आण्णासाहेब पाटील महामंडळ योजनेतंर्गत कर्ज देण्यासाठी बँकांना सक्तीचे आदेश द्यावेत.
  • मौजे कोपर्डी ता. कर्जत घटनेतील अत्याचार व हत्या करणाऱ्या नराधम आरोपींना लवकरात लवकर फाशीची शिक्षा देण्यात यावी.
  • अनुसूचित जाती व जमाती अत्याचार प्रतिबंध अधिनियमाच्या तरतुदींचा सर्रास होणारा गैरवापर थांबवावा व योग्य ती दुरुस्ती करावी.
  • आण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ पूर्ण क्षमतेने कार्यान्वित करणे.