११ हजार कोटींचा देशाला चुना लावणारा मोदी म्हणतोय आता कर्जवसुली विसरा !

nirav-modi-pnb

टीम महाराष्ट्र देशा- पंजाब नॅशनल बँक अर्थात पीएनबी कर्ज घोटाळ्यात पहिल्यांदाच नीरव मोदीने मौन सोडलं आहे. हे प्रकरण सार्वजनिक केल्यामुळे पीएनबीने कर्ज वसुलीचे सर्व मार्ग बंद केले आहेत, असं नीरव मोदीने पत्र लिहून म्हटलं आहे. देशातला सर्वात मोठा कर्ज घोटाळा करणाऱ्या नीरव मोदीने उलट्या बोंबा ठोकणं सुरु केलं आहे.

‘पीटीआय’ने नीरव मोदीच्या पत्राबाबत वृत्त दिलं आहे. ”चुकीच्या पद्धतीने कर्जाची आकडेवारी सांगितल्यामुळे माध्यमांमध्ये हे प्रकरण गेलं आणि चौकशी सुरु झाली. परिणामी कामही बंद झालं. प्रकरण सार्वजनिक झाल्यामुळे व्यवसायावर परिणाम झाला आहे. आता बँकेचं कर्ज चुकतं करण्याची आमची क्षमताही धोक्यात आली आहे,” असं नीरव मोदीने म्हटलं आहे.पंजाब नॅशनल बँकेच्या प्रशासनाला उद्देशून लिहण्यात आलेलं हे पत्र १५ किंवा १६ फेब्रुवारीला लिहीण्यात आले आहे. या पत्रात त्याने म्हटले आहे की त्याच्या कंपन्यांवर फक्त ५ हजार कोटींचे कर्ज आहे. चुकीच्या कर्जाचे आकडे सांगितल्याने आणि त्याचा प्रसारमाध्यमांमध्ये प्रचंड गवगवा झाल्याने तत्काळ माझ्या शोधाचे प्रयत्न सुरू झाले, सोबतच माझ्या समूहाचे कामकाजही ठप्प झाल्याने कर्ज परतफेडीची आमची क्षमता धोक्यात आली आहे.

हा घोटाळा समोर येताच सीबीआयने त्याच्या कार्यालय, निवासस्थानांना सील ठोकण्याचे काम तातडीने सुरू केलं. त्याची आत्तापर्यंत ५७६१ कोटींची संपत्ती जप्त करण्यात आली आहे. १३ फेब्रुवारीला मी कर्ज परतफेडीसाठी दिलेल्या प्रस्तावानंतरही पीएनबी बँकेने आपल्या समूहावरील कर्जाची माहिती सार्वजनिक केली. यामुळे माझ्या समूहाच्या इज्जतीला धक्का बसला असल्याचं रडगाणं मोदीने गायला सुरुवात केली आहे. पीएनबी बँक ही देशातील दुसऱ्या क्रमांकाची सगळ्यात मोठी बँक असून या बँकेने ११ हजार ३०० कोटी रूपयांचा कर्जघोटाळा झाल्याचं म्हटलं होतं. या घोटाळ्यामध्ये भाऊ, काका आणि बायकोचं नाव सामील करणं हे अयोग्य असल्याचंही मोदीने या पत्रात म्हटले आहे.

काही दिवसांपूर्वीच पंजाब नॅशनल बँकेला नीरव मोदीने चुना लावल्याची बातमी समोर आली. तसेच नीरव मोदीने जानेवारी महिन्यातच देश सोडला आहे. त्याचा शोध इंटरपोलच्या मदतीने घेतला जातो आहे. मात्र आता या सगळ्या प्रकरणात त्याने एक पत्र लिहून बँकेचे कर्ज फेडू शकत नसल्याचे म्हटले आहे. दरम्यान या घोटाळ्याप्रकरणी सीबीआयने आत्तापर्यंत पीएनबी बँकेच्या सहा अधिकाऱ्यांना अटक केली आहे. लेटर ऑफ अंडरटेकिंग च्या आधारे बँकेच्या आजी माजी अधिकाऱ्यांनी नीरव मोदीला कर्ज मिळवून दिल्याचे समोर आल्याने ही कारवाई करण्यात आली आहे. यात आणखी कोणाकोणाचे हात गुंतले आहेत याचाही तपास करण्यात येतो आहे.Loading…
Loading...