fbpx

काश्मिरी जनतेला स्वातंत्र्य हवे आहे, कॉंग्रेस नेत्याच्या वक्तव्यानंतर संतापाची लाट

श्रीनगर – स्वातंत्र्य मिळवणे ही काश्मीरमधील जनतेची पहिली प्राथमिकता आहे, असे धक्कादायक वक्तव्य काँग्रेसचे जम्मू-काश्मीरमधील ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय मंत्री सैफुद्दीन सोझ यांनी केले आहे. काँग्रेसचे नेते सैफुद्दीन सोझ यांनी जम्मू-काश्मीरसंदर्भात हे वक्तव्य करून नवा वाद निर्माण केला आहे.या वक्तव्यानंतर देशभरात संतापाची लाट उसळली आहे.

हे माझे वैयक्तिक मत असल्याचे सोझ यांनी सुरूवातीलाच स्पष्ट केले. तसेच आपल्या वक्तव्याशी काँग्रेसचा काहीच संबंध नसल्याचे त्यांनी स्पष्ट सांगितले. मी वैयक्तिकरित्या काश्मीरच्या लोकांच्या वतीने हे बोलत असल्याचेही ते म्हणाले.

कोण आहेत सोझ ?

सोझ हे यूपीए सरकारमध्ये मंत्री होते. जम्मू-काश्मीरचे ते मोठे नेते आहेत. सोझ यांनी काश्मीरच्या इतिहास आणि वर्तमानाशी निगडीत एक पुस्तक लिहिले आहे. त्याचे लवकरच प्रकाशन केले जाणार आहे.मतदानाची वेळ आली तर काश्मीरचे लोक भारत किंवा पाकबरोबर जाण्यापेक्षा स्वतंत्र राहणे पसंत करतील, असे पाकिस्तानचे माजी राष्ट्रपती परवेझ मुशर्रफ यांनी म्हटले होते. त्यांच्या या वक्तव्याचे सोझ यांनी समर्थन केले आहे.

नेमकं काय म्हणाले सोझ?

स्वातंत्र्य मिळवणे ही काश्मिरी जनतेची पहिली प्राथमिकता आहे, असे मला वैयक्तिकरीत्या वाटते. काश्मीरला ना भारतासोबत राहायचे आहे ना पाकिस्तानमध्ये विलीनीकरण करून घ्यायचे आहे. सद्यस्थितीत काश्मीरमधील जनतेसाठी शांततापूर्ण वातावरण तयार करण्याची गरज आहे, जेणेकरून येथील जनता शांततेने नांदू शकेल. दरम्यान, आपल्या या वक्तव्याशी काँग्रेस पक्षाचा काहीही संबंध नसून, वैयक्तीक पातळीवर आपण काश्मिरी जनतेच्यावतीने हे वक्तव्य करत असल्याचेही सोझ यांनी पुढे स्पष्ट केले.

सद्यस्थितीत काश्मीरशी जोडल्या गेलेल्या देशांमुळे काश्मीरला स्वातंत्र मिळणे शक्य नाही. मात्र काश्मीरचे पाकिस्तानमध्ये विलीनीकरण करण्याची काश्मिरी जनतेची इच्छा नाही, असेही सोझ यांनी स्पष्ट केले आहे. दरम्यान, सोझ यांच्या या वक्तव्यानंतर त्यांच्यावर चौफेर टीका होऊ लागली आहे.