शिशीर शिंदे यांचा शिवसेना प्रवेशाबाबत मोठा खुलासा

मुंबई – मनसेचे माजी नेते शिशिर शिंदे व शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट झाली असून, शिंदे शिवसेनेच्या वाटेवर असल्याच्या आरोपांना शिंदे यांनी फेटाळून लावले आहे.या चर्चेबाबत बोलताना ते म्हणाले, की उद्धव ठाकरे यांची शनिवारी अचानक भेट झाली. शिवसेना नगरसेवक दिलीप लांडे यांच्या मुलाचा लग्नसोहळा शनिवारी वांद्रे-कुर्ला संकुलात पार पडला, त्याला उद्धव ठाकरे उपस्थित होते, त्या वेळी भेट झाली. उद्धव ठाकरेंसोबत झालेली ही भेट अचानक झाल्याचे शिंदे यांनी स्पष्ट केले.

काही दिवसांपूर्वी बीकेसी येथील एका लग्नसमारंभात उद्धव ठाकरे आणि शिशीर शिंदे यांची भेट झाली होती. या भेटीत दोन्ही नेत्यांमध्ये बराचकाळ चर्चाही झाली होती.दरम्यान, राम कदम आणि प्रवीण दरेकर यांसारखे बडे नेते मनसेतून बाहेर पडले आहेत. काही महिन्यांपूर्वीच मनसेच्या सहा नगरसेवकांनी शिवसेनेत प्रवेश केला होता. त्यामुळे आता शिशीर शिंदेंसारख्या जुन्या नेत्याने शिवसेनेत प्रवेश केल्यास मुंबई उपनगरात मनसेला आणखी एक मोठे खिंडारपडेल अशी शक्यता वर्तविण्यात येत होती.

राज ठाकरे यांनी 2006 मध्ये शिवसेना सोडल्यानंतर त्यांच्यासोबत बाहेर पडलेल्या प्रमुख नेत्यांमध्ये शिशीर शिंदे यांचा समावेश होता. त्यामुळे मनसेतील अनुभवी आणि जाणते नेतृत्त्व म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. मनसेने 2009 साली लढविलेल्या पहिल्याच विधानसभा निवडणुकीत शिशीर शिंदे भांडूप (प.) विधानसभा मतदारसंघातून निवडून आले होते. समाजवादी पक्षाचे नेते अबू आझमी यांना विधानसभेत मारहाण करणाऱ्या मनसे नेत्यांमध्ये त्यांचा समावेश होता. यामुळे ते बराच काळ चर्चेतही होते.

You might also like
Comments
Loading...