कोल्हापूर : शिवसेना तटस्थ, कॉंग्रेसचा महापौर, भाजपला धक्का

कोल्हापूर : कोल्हापूर महानगरपालिकेतील महापौरपदाच्या निवडणुकीत शिवसेनेने भाजपाला दणका दिला असून शिवसेनेचे चार नगरसेवक निवडणुकीत तटस्थ राहिले. यामुळे काँग्रेसने सहज विजय मिळवला.कॉंग्रेसच्या शोभा बोंद्रे यांनी ताराराणी- भाजपा युतीच्या उमेदवार रुपराणी निकम यांचा पराभव केला आहे .

महापौर स्वाती यवलुजे आणि उपमहापौर सुनील पाटील यांचा कार्यकाळ पूर्ण झाल्यानंतर त्यांनी आपल्या पदाचे राजीनामे यापूर्वीच दिले होते . यामुळे रिक्त झालेल्या महापौर आणि उपमहापौर पदांसाठी आज मतदान होते. संख्याबळ नसताना शिवसेनेने महापौर पदासाठी अर्ज दाखल केल्याने निवडणुकीची रंगत वाढली होती.

महापौरपदाच्या निवडणुकीत शोभा बोंद्रे यांचा 11 मतांनी विजय झाला. शोभा बोंद्रे यांना 44 मतं मिळाली तर निकम यांना 33 मतं मिळवता आली.शिवसेनेच्या उमेदवार प्रतिज्ञा निल्ले तटस्थ राहिल्यामुळे आणि त्यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतल्यामुळे काँग्रेसचा विजय सुकर झाला.

सेनेच्या नगरसेविका प्रतिज्ञा निल्ले-उत्तुरे यांनी पुरेशे मते नसतानाही महापौर पदासाठी अर्ज केलेला होता. महापालिकेत कॉंग्रेस-राष्ट्रवादीकडे ४४ नगरसेवक होते. तर भाजप-ताराराणी आघाडीकडे ३३ चे संख्याबळ होते. त्यामुळे महापौर निवडीत नेमके कोण बाजी मारणार याकडे सर्वांचे लक्ष लागलेले होते.

तसेच राष्ट्रवादीचे महेश सावंत उपमहापौरपदी निवड झाली आहे. भाजप आघाडीचे कमलाकर भोपळे यांचा त्यांनी पराभव केला .या पराभवामुळे कोल्हापूरमध्ये भाजपाचा महापौर करण्याचे चंद्रकात पाटील यांचे स्वप्नही अधुरेच राहिले.

पक्षीय बलाबल : (एकूण जागा 81)
काँग्रेस-राष्ट्रवादी : जागा 44
भाजप-ताराराणी आघाडी : 33 जागा
शिवसेना : 4 जागा