fbpx

अच्छे दिन आयेंगे; आसाराम बापूची ऑडिओ क्लिप तुफान व्हायरल

टीम महाराष्ट्र देशा- स्वयंघोषित अध्यात्मिक गुरु आसाराम बापू याला बलात्कार प्रकरणात न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. मात्र जोधपूरच्या तुरुंगात मरेपर्यंत जन्मठेपेची शिक्षा भोगत असणाऱ्या आसाराम बापूची एक कथित ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आहे. ‘माझा तुरुंगवास तात्पुरता आहे.तुरुंगात मी आता काही काळासाठीच राहणार असून अच्छे दिन नक्की येतील’, असे आसाराम बापू एका व्यक्तीला फोनवर सांगत आहे .

याबाबत जोधपूर केंद्रीय कारागृहाचे पोलीस उपमहानिरीक्षक विक्रम सिंह यांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी फोनवरून बोलताना आसारामची ही १५ मिनिटांची क्लिप रेकॉर्ड केली गेली असावी. या संवादाच्या दोन दिवसांपूर्वी कोर्टाने अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी आसारामला मरेपर्यंत जन्मठेपेची शिक्षा ठोठावली होती. तुरुंग अधिकाऱ्याच्या परवानगीनेच आसारामने हा फोन केल्याचे सिंह म्हणाले. कैद्यांना एका महिन्यात ८० मिनिटांपर्यंत केवळ दोन नंबर्सवर बोलण्याची परवानगी दिली जाते. आसारामचे शुक्रवारी संध्याकाळी साडे सहावाजता साबरमती आश्रमातील एका ‘साधका’शी बोलणे झाले. त्यावेळी हे बोलणे रेकॉर्ड केले गेले असावे असे वाटते, अशी माहिती सिंह यांनी दिली.

काय आहे या ऑडिओ क्लिपमध्ये ?
आपण सर्वांनीच कायदा आणि सुव्यवस्थेचा आदर केला पाहिजे. काही लोकांनी मला आणि आश्रमाला बदनाम करुन स्वतःचे वर्चस्व निर्माण करण्यासाठी कट रचला. आश्रमाच्या लेटरहेडवर येणाऱ्या पत्रकांवर विश्वास ठेवू नका.माझ्यासह या खटल्यात दोषी ठरलेले शिल्पी आणि शरत चंद्र या दोघांची आधी तुरुंगातून सुटका व्हावी, यासाठी प्रयत्न करणार. मुलांची जबाबदारी पालकांची असते. गरज पडल्यास शिल्पी आणि शरतसाठी वकिलांचीही व्यवस्था केली जाईल. त्यानंतर मग बापू तुरुंगाबाहेर येईल. खालच्या न्यायालयात जर चूक झाली असेल तर ती वरच्या न्यायालयात सुधारता येते.सत्य कधीही लपून राहत नाही आणि असत्याला पाय नसतात. झालेले सर्व आरोप चुकीचे आहेत,अच्छे दिन नक्की येतील.