शिवरायांबद्दल अपशब्द वापरणाऱ्या छिंदमला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी

अहमदनगर : शिवरायांबद्दल अपशब्द वापरणारा भाजपचा अहमदनगरमधील निलंबित उपमहापौर श्रीपाद छिंदमला नागरिकांनी गुन्हे अन्वेषण विभागाच्या ताब्यात दिलं. शनिवारी कोर्टात हजर केल्यानंतर छिंदमला चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.

भाजपने केले निलंबित खुर्ची ही गमवावी लागली
श्रीपाद छिंदम यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल अपशब्द वापरल्याचा ऑडीयो व्हायरल होताच नगर शहरात याचे पडसाद उमटत आहेत. तसेच भारतीय जनता पार्टी अहमदनगर जिल्हाध्यक्ष खासदार दिलीप गांधी यांनी श्रीपाद छिंदम याचा तीव्र शब्दात निषेध केला. तसेच छिंदम यांची भारतीय जनता पार्टि व उपमहापौर पदावरुन हकालपट्टी करण्यात आली आहे.

काय आहे प्रकरण?
श्रीपाद छिंदम हे अहमदनगर महापालिकेचे उपमहापौर आहेत. छिंदम यांनी त्यांच्या प्रभागात काम करण्यासाठी पालिकेकडे कर्मचारी मागितले होते. संबंधित कर्मचाऱ्याने तुम्हाला तुमचे काम करून देतो, मी नाही म्हणालेलो नाही. पण शिवजयंती होऊ दिली तर बरं होईल, अशी विनंती केली. कर्मचाऱ्याच्या उत्तराने चिडलेल्या छिंदम यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल अपशब्द वापरले. कर्मचाऱ्यावर आपला रोख झाडताना त्यांची जीभ घसरली, दरम्यान ही ऑडियो क्लिप व्हायरल झाली आहे. संबंधित कर्मचाऱ्याने यूनियनकडे तक्रार केल्यानंतर सर्व प्रकार समोर आला आहे.