माओवाद्यांची मुख्यमंत्र्यांना जीवे मारण्याची धमकी

टीम महाराष्ट्र देशा- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना नक्षलवाद्यांनी जीवे मारण्याची धमकी दिली आहे. एका निनावी पत्राच्या माध्यमातून मुख्यमंत्री आणि त्यांच्या कुटुंबियांना लक्ष्य करण्याची धमकी देण्यात आली आहे. मागच्या महिन्यात गडचिरोलीमध्ये नक्षलवाद्यांविरोधात कारवाई करण्यात आली होती तसेच आता पुण्यातून नक्षलवाद्यांशी संबंध असल्याच्या संशयातून पाच जणांना अटक करण्यात आली आहे. त्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नावाने एक निनावी पत्र आले आहे.

माओवाद्यांकडून राजीव गांधी हत्याकांडासारखं घातक कृत्य करण्याचा प्रयत्न होता, असं सरकारी वकिल उज्ज्वला पवार यांनी पुणे सत्र न्यायालयात सांगितलं. त्यामुळे माओवाद्यांच्या निशाण्यावर नरेंद्र मोदीचं असल्याचा संशय व्यक्त होत असतानाच देवेंद्र फडणवीस यांना देखील पत्र पाठवण्यात आल आहे. या पत्रात आमचा मार्क्सवादाचा विचार तुम्ही संपवू शकणार नाही असे म्हटले आहे. दरम्यान हे पत्र मिळाल्यानंतर गृहविभागाने मुख्यमंत्री फडणवीस आणि त्यांच्या कुटुंबियांची सुरक्षा अधिक कडक केली आहे.

दरम्यान, जानेवारीमधल्या कोरेगाव भीमाप्रकरणी पुणे पोलिसांनी नक्षलवादी असल्याचा संशय घेत पाच जणांना अटक केली होती. या संदर्भात चौकशी केली असता सरकारी वकिल उज्ज्वला पवार यांनी विशेष न्यायालयात सांगितले की अटक केलेल्यांकडे जे साहित्य सापडले त्यावरून बंदी असलेली कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया (माओवादी) राजकीय हत्येचा कट रचत होती.

कोरेगाव भीमा हिंसाचार प्रकरणी पोलिसांनी पाच जणांना नुकत्याच बेड्या ठोकल्या आहेत. तपासादरम्यान पोलिसांना याबाबत एक पत्र मिळालं असल्याचा दावाही सरकारी वकिलांनी न्यायालयात केला. चार लाख राऊंड फायर करण्याची क्षमता असलेलं एम 4 हे शस्त्र खरेदी करण्याचा प्लान असल्याचा धक्कादायक उल्लेख या पत्रात आहे. यासाठी आठ कोटी रुपये देण्याची तयारीही दर्शवल्याची माहिती आहेया शस्त्रांच्या आधारे एका मोठ्या नेत्याच्या हत्येचा कट आखला जात होता. असं सरकारी वकिल उज्ज्वला पवार यांनी न्यायालयात सांगितल्याने, माओवाद्यांकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हत्येचा कट रचल्या गेल्याचा संशय आहे.