सांगोला : गणपतराव देशमुखांच्या अभेद्य गडाला भाजप जिंकणार का ?

ganpatrao-deshmukh_

देशात सर्वाधिक काळ आमदार म्हणून निवडून येण्याचा विक्रम प्रस्थापित असलेले आमदार गणपतराव देशमुख याही वर्षी पुन्हा विधानसभेच्या मैदानात उतरण्याच्या तयारीत आहेत. सांगोला मतदारसंघातून तब्बल अकरा वेळा शेतकरी कामगार पक्षातर्फे गणपतराव प्रतिनिधित्व करत आलेले आहेत. 1972 व 1995 असे दोन अपवाद वगळता 1962 पासून गणपतराव सतत सांगोला मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत आलेले आहेत. लोकांशी असलेला थेट संपर्क आणि स्वच्छ चारित्र्य हि गणपतराव देशमुख यांची आजपर्यंत बलस्थाने राहिलेली आहेत.

गणपतराव देशमुख यांच्या वयोमानानुसार शेकाप कडून नवीन चेहरा देण्याची चर्चा मागच्या दोन निवडणूकापासून केली जाते आहे. याही वेळेसे पुन्हा तशी चर्चा सुरू आहे. फॅबटेक उद्योगसमूहाचे भाऊसाहेब रूपणवर, गणपतरावांचे सुपुत्र आणि जिल्हा बॅंकेचे संचालक चंद्रकांत देशमुख अश्या नावांची अधुनमधुन चर्चा होत असते. पण जेष्ठ कार्यकर्त्यांच्या म्हणण्यानुसार याहीवेळेस गणपतरावच शेकापचे उमेदवार असतील अशी चिन्हे आहेत.

दुसरीकडे भाजपतर्फे गणपतराव देशमुखांना रोखण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. भाजप तालुकाध्यक्ष श्रींकात देशमुख आपल्या कामामधून आणि सरकारी योजणांच्या माध्यमातून पुन्हा विधानसभेच्या रिंगणात उतरण्याच्या तयारीत आहेत. सोबतच माजी आमदार पुर्वाश्रमीचे काॅग्रेसचे व 2014 ची विधानसभा शिवसेनेकडून लढलेले शहाजीबापू पाटील हेदेखील यावेळेस भाजपकडून प्रयत्नशील आहेत. मागच्या वर्षी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सांगोला दौऱ्यावर  आले असताना त्यांनी शहाजीबापू पाटील यांच्या घरी देखील भेट दिली होती.

सामाजिक कार्यकर्त्या व महिला महासंघाच्या तालुकाध्यक्ष राजश्रीताई नागणे यांनी बचत गटाच्या माध्यमातून मागच्या काही दिवसात मतदारसंघात बराच जनसंपर्क केला आहे. सोशल मिडियाच्या माध्यमातून देखील आपली दावेदारी त्या दाखवत आहेत. लवकरच भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे पाटील यांच्या हस्ते त्यांचा भाजप प्रवेशाची चर्चा आहे. मतदारसंघाच्या पहिल्या महिला आमदार म्हणून कदाचित भाजपतर्फे राजश्रीताई नागणे यांची उमेदवार म्हणून वर्णी लागू शकते.

माजी आमदार व राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष दिपक आबा सांळुखे पाटील राष्ट्रवादीचे उमेदवार असू शकतात पण गणपतराव देशमुख व राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या वैयक्तिक संबंधामुळे राष्ट्रवादी याहीवेळेस गणपतरावांना समर्थन देईल अशी चिन्हे आहेत. मागच्या विधानसभेला काॅग्रेसचे उमेदवार जगदीश बाबर नारायण राणे यांच्या महाराष्ट्र स्वाभिमान पक्षात गेल्याने काॅग्रेसला नवा उमेदवार शोधावा लागेल. तीच स्थिती शिवसेनेकडे सुद्धा आहे. त्यांना सुद्धा यावेळेस नवीन उमेदवार शोधावा लागेल.

विधानसभेच्या निवडणुकांना अजून दिड वर्षाचा कालावधी असताना इच्छुक उमेदवारांनी मोर्चेबांधनी सुरू केली आहे. राज्यपातळीवरील युती-आघाडीच्या राजकारणाने स्थानिक पातळीवरील राजकारणाचे चित्रही बदलत राहिल. पण सर्वाधिक काळ आमदार म्हणून निवडून येण्याचा विक्रम असलेल्या गणपतरावांना भाजप रोखणार का ? हे पाहण्यासाठी 2019 च्या विधानसभा निवडणुकांचीच वाट पाहावी लागेल..

– प्रविण रघुनाथ काळे