डिव्हिलियर्स नावाच्या वादळाचा क्रिकेटला अलविदा

टीम महाराष्ट्र देशा- धडाकेबाज फलंदाज एबी डी’व्हिलियर्स काही मिनिटांपूर्वीच क्रिकेटला अलविदा करण्याचा निर्णय घेत क्रिकेट जगताला मोठा धक्का दिला. पुढील वर्षी होणाऱ्या विश्वचषकापूर्वी डी’व्हिलियर्सने हा निर्णय घेतल्यामुळे दक्षिण आफ्रिकेच्या संघालाही हा मोठा धक्का असेल. डी’व्हिलियर्सने ट्विटरच्या माध्यमातून ही गोष्ट साऱ्यांना सांगितली आहे.

आज आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन एक छोटासा व्हिडीओ शेअर करत डिव्हीलियर्सने आपल्या निवृत्तीची घोषणा केली आहे. ज्या मैदानावर डिव्हीलियर्सने पहिल्यांदा क्रिकेट सामना खेळला त्या टच क्रिकेट क्लबच्या मैदानावरुन  व्हिडीओ शेअर करत डिव्हीलियर्सने क्रिकेटमधून निवृत्ती स्विकारली आहे.

डिव्हिलियर्सनं 2004 साली दक्षिण आफ्रिकेसाठी कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण केलं होतं. गेल्या 14 वर्षांच्या कारकीर्दीनंतर आपण थकलो असल्याची प्रामाणिक कबुली त्यानं दिली. डिव्हिलियर्सनं 114 कसोटी, 228 वन डे आणि 78 ट्वेन्टी ट्वेन्टी आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये दक्षिण आफ्रिकेचं प्रतिनिधित्व केलं आहे.

“मी आता कंटाळलो आहे. शिवाय तरुणांना संधी देण्याची हीच योग्य वेळ आहे. त्यामुळे या क्षणापासूनच मी क्रिकेटला अलविदा करत आहे” असं डिव्हिलियर्स म्हणाला.

एबी डिव्हिलियर्सची आंतरराष्ट्रीय कारकीर्द
वन डे कामगिरी
सामने – 228
धावा – 9577
शतकं – 25
अर्धशतकं – 53

कसोटी कामगिरी
सामने – 114
धावा – 8765
शतकं – 22
अर्धशतकं – 46

टी-20 कामगिरी
सामने – 78
धावा – 1672
शतकं – 0
अर्धशतकं – 10