आरक्षण म्हणजे कलंक, अनुसूचित जातीतून आम्हाला वेगळे करा

टीम महाराष्ट्र देशा- आरक्षणाच्या मागणीसाठी विविध संघटना मोठ मोठी आंदोलने करतात आणि राजकीय पक्ष याचं भांडवल करून मते मिळवतात हि वस्तुस्थिती कोणीही नाकारू शकणार नाही. मात्र आता देशात दलितांचा असाही एक समूह आहे ज्यांना अनुसूचित जाती, जमातीच्या सूची बाहेर पडायचे आहे. तामिळनाडूमधील दलित समाजाच्या काही सदस्यांनी यासंदर्भातील मागणी केली असून या मागणीमुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहे.

देवेंद्र कुला वेल्लार जातीशी संबंध असलेल्या या समूहाचे सुमारे एक लाखांहून अधिक सदस्य आहेत. या सदस्यांनी दिलेल्या माहितीनुसार, आगामी ६ मे रोजी ते आपल्या मागणीसाठी पुठिया तामिळगाम पक्षाच्या फलकाखाली आंदोलन करणार आहेत. पक्षाचे सदस्य विरधुनगर येथे एकत्रित येतील आणि अनुसूचित जातीतून आम्हाला वेगळे करा अशी मागणी करणार आहेत. पुठिया तामिळगाम पक्षाचे नेते कृष्णास्वामी म्हणाले की, समाजात देवेंद्र कुला वेल्लार समाजाच्या लोकांबरोबर अस्पृश्यता पाळली जाते. त्यामुळे त्यांना आपली ही ओळख पुसायची आहे.

नेमकं काय म्हणणे आहे या सदस्यांचे
आरक्षण एका कलंकाप्रमाणे आहे. या कलंकामुळे समाजात निष्कासनाचा त्रास सहन करावा लागतो. दलितांकडे फक्त ‘व्होट बँक’ म्हणूनच पाहिले जाते. आम्हाला हे आता बदलायचे आहे. त्यामुळे आम्हाला या प्रवर्गातून स्वत:हून बाहेर पडायचे आहे.