fbpx

सुजय विखेंसाठी पंतप्रधान नगरमध्ये, राधाकृष्ण विखेंचा प्रवेश मात्र लांबणीवर

अहमदनगर: अहमदनगर लोकसभेचे उमेदवार डॉ सुजय विखे यांच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा काही वेळात सुरु होणार आहे, या सभेमध्ये विधानसभेचे विरोधीपक्ष नेते राधाकृष्ण विखे-पाटील भाजप प्रवेश करणार असल्याची चर्चा होती, मात्र विखे हे अद्याप कॉंग्रेसमध्येच राहणार असल्याचं स्पष्टीकरण त्यांचे पुत्र सुजय विखेंनी वृत्तसंस्थेशी बोलताना दिले आहे. दरम्यान, पुत्र भाजपकडून लढत असताना वडिलांची मात्र कोंडी होताना दिसत आहे, तर विरोधी पक्षनेताचं भाजपमध्ये गेला असता तर महाराष्ट्र काँग्रेससाठी हा फार मोठा धक्का ठरला असता.

भाजप-शिवसेना युतीचे उमेदवार सुजय विखे यांच्या प्रचारार्थ पंतप्रधान मोदी यांची आज नगरमध्ये सभा होणार आहे. या सभेसाठी जोरदार शक्तिप्रदर्शन करण्याची तयारी भाजपचे उमेदवार सुजय विखेंनी केली आहे. सकाळी 11 वाजता नगरच्या निरंकारी भवनामागील मैदानावर मोदींची भव्य सभा आयोजित करण्यात आली आहे. या सभेसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री रामदास आठवले, पालकमंत्री राम शिंदेंसह जिल्ह्यातील आमदार, पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.

दरम्यान, काँग्रेसचे नेते राधाकृष्ण विखे-पाटील हेदेखील मुला पाठोपाठ भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची जोरदार चर्चा सुरू होती. परंतु ते भाजप प्रवेश करणार नसून काँग्रेसमध्ये राहणार असल्याचे स्पष्ट झाल्याने तूर्तास तरी कॉंग्रेसला दिलासा मिळाला आहे.