राज्यातील १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांच्या लसीकरणाला ‘ब्रेक’; राजेश टोपेंची माहिती

मुंबई : कोरोनावर मात करण्यासाठी देशातील अधिका-अधिक नागरिकांचे लसीकरण होणे गरजेचे आहे. राज्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता धास्तावलेल्या जनता लसीकरणाला चांगला प्रतिसाद देत आहे. मात्र, एकीकडे कोरोनाचा वाढता धोका तर दुसरीकडे लसींचा तुटवडा यामुळे नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे.

लसींचा तुटवडा असल्याने मोजक्याच ठिकाणी लसीकरण केले जात आहे. तर, नोंदणी केल्यानंतरच लसीकरण होत असले तरी साठा उपलब्ध झाला नसल्याचे कारण लसीकरण केंद्रावर दिले जात असल्याने अनेक नागरिकांना विना लसीकरणच माघारी यावं लागत आहे. यासोबतच, ४५ हुन अधिक वय असलेल्या नागरिकांना दुसरा डोस मिळण्यास अडचण निर्माण झाली आहे. यामुळे नागरिकांमध्ये अस्वस्थता पसरत असून आता राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी मोठा निर्णय घेतला आहे.

राज्यात १८ ते ४४ वयोगटातील लसीकरणाला स्थगिती देण्यात आली आहे. लसींची कमतरता असल्यानं ही घोषणा केल्याचे राजेश टोपे यांनी सांगितलंय. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर ते माध्यमांशी बोलत होते. लसीचा पहिला डोस घेतलेल्या जेष्ठ नागरिकांना दुसरा डोस देण्याची गरज आहे. त्यामुळेच, १८ ते ४४ वयोगटाच्या नागरिकांना तूर्तास लसी दिली जाणार नाही. या गटासाठी खरेदी केलेल्या लसी ४५ पेक्षा जास्त वयोगटाच्या नागरिकांना देणार,’ असं टोपे म्हणाले आहेत. यामुळे दुसरा डोस मिळण्यास आता मदत होणार आहे.

महत्वाच्या बातम्या