‘मुस्कान’ला वाचविणाऱ्या वैभवचे युएसके फाउंडेशनकडून कौतुक

पुणे : स्वतःच्या जीवाची पर्वा न करता पाण्यात उडी घेऊन मुस्कान पठाण या पाचवीतील विद्यार्थिनीचा जीव वाचविणाऱ्या वैभव गायकवाड याचे त्याच्या धाडसाबद्दल पुण्यातील युएसके फाउंडेशनच्या वतीने कौतुक करण्यात आले. शिरोळे रस्त्यावरील युएसके फाउंडेशनच्या कार्यालयात झालेल्या छोटेखानी कार्यक्रमात त्याचा युएसके फाउंडेशनच्या अध्यक्षा डॉ. उषा काकडे यांच्या हस्ते सायकल देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी वैभवाचे आई-वडील छाया व सुनील गायकवाड, आजी सुंदराबाई धुळे, त्याचे शिक्षक संतोष गाडगे व तुळशीदास जाधव यावेळी उपस्थित होते.
राज्यभर होत असलेल्या पावसामुळे सर्वच नद्या, नाले, कालवे दुथडी भरून वाहत आहेत. गेल्या आठवड्यात येडगाव धरण क्षेत्रात मोठ्या पावसामुळे कुकडी डाव्या कालव्याला मोठा पूर आला होता. जुन्नर तालुक्यातील जाधववाडी (बोरी बुद्रुक) येथील जगदंबा माध्यमिक विद्यालयात शिकणारी मुस्कान पठाण ही पाचवीतील विद्यार्थिनी शाळेतून घरी जात असताना पाण्यात पडली. इतर विद्यार्थी आणि जवळपासच्या व्यक्तींनी आरडाओरडा केला. त्याचवेळी वैभव गायकवाडने पाण्यात उडी घेत बुडणाऱ्या मुस्कानला शर्तीचे प्रयत्न करीत बाहेर काढले.
डॉ. उषा काकडे म्हणाल्या, “तेरा वर्षीय वैभवने दाखवलेले धाडस अचंबित करणारे आहे. त्याच्यातील साहसी वृत्ती इतरांना प्रेरणा देणारी आहे. वैभवने केवळ बघ्याची भूमिका न घेता प्रत्यक्ष कृती करून मुस्कानला जीवदान दिले. त्याच्या या कर्तृत्त्वाचा सन्मान व्हावा. त्याला राष्ट्रीय पुरस्कार मिळण्यासाठी शिफारस करणार आहे.”


“संकटात असलेल्या व्यक्तीला मदत करायची, हा संस्कार शिक्षक-पालकांकडून मिळालेला असल्याने भीती बाजूला ठेवत पाण्यात उडी घेतली. मुस्कानचा केवळ हात दिसत होता. त्यामुळे त्याचा आधार घेत डोक्याच्या केसांना धरून तिला वर ओढले व नंतर हाताला धरून बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. पण ज्या झाडाला धरले, तेही पाण्याच्या प्रवाहाने उपटून आल्याने आम्ही पुन्हा एकदा वाहत होतो. दुसऱ्या झाडाला धरून आम्ही बाहेर पडलो. बाहेर आल्यावर मलाही चक्कर आल्यासारखे झाले. पण मुस्कानचा जीव वाचविल्याचा आनंद आहे,” अशी भावना वैभवने व्यक्त केली.