बालाच्या कुस्तीला मिळणार राजाश्रय, शासकीय नोकरी आणि घरासाठी प्रयत्न करणार – सहकारमंत्री

मुंबई: मुळचा सोलापूर जिल्ह्यातील करमाळ्याचा असणाऱ्या बालारफिक शेखने प्रतिकूल परिस्थितीवर मात करत यंदाच्या महाराष्ट्र केसरी किताबावर आपले नाव कोरले आहे. बालाने मिळवलेल्या यशाने संपूर्ण जिल्ह्याची मान उंचावली आहे. आता बालारफिकच्या कुस्तीला अधिक चालना देण्यासाठी सहकारमंत्री सुभाष देशमुख हे पुढे आले आहेत. आगामी काळात बाला रफिकला शासकीय नोकरी आणि घर मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील राहणार असल्याचं, सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी सांगितले आहे.

महाराष्ट्र केसरी बाला रफिकने गुरुवारी सुभाष देशमुख यांची  भेट घेतली, यावेळी त्याचे वडील आझम शेख हे देखील उपस्थित होते. आपल्या जिल्ह्यातील मल्ल महाराष्ट्र केसरी झाल्याच्या गौरव सांगण्यासाठी देशमुख यांनी बाला आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घडवून आणली, मुख्यमंत्री फडणवीस यांनी बालाचे कौतुक करत त्याचे अभिनंदन केले. यावेळी मंत्री देशमुख यांनी बाला रफिक आणि त्याच्या वडिलांचा संघर्ष मुख्यमंत्री फडणवीस यांना सांगितला.

दरम्यान, सामान्य कुटुंबातून आलेल्या बालाने कुस्तीच्या फडात मोठे यश मिळवले आहे. पुढील काळात बालाच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहणार असून, त्याला शासकीय नोकरी आणि घर देण्यासाठी माझा प्रयत्न सुरु असल्याचं, सुभाष देशमुख यावेळी म्हणाले.