ब्रॅडॉन मॅक्युलम : न्यूझीलंड क्रिकेटच्या इतिहासात त्रिशतकीय खेळी करणारा पहिला खेळाडू…

mcllum

दिग्विजय दीक्षित, पुणे : भारतीय संघाचा २०१४ सालचा न्यूझीलंड दौरा, त्यात पहिला कसोटी सामना भारताने ४० धावांनी गमावलेला होता. दुसऱ्या सामन्यात न्यूझीलंडला केवळ १९२ धावांवर रोखल्यावर, अजिंक्य रहाणेच्या शतकाच्या मदतीने भारतीय संघाने जेव्हा ४३८ धावांचा टप्पा गाठला आणि त्यानंतर झहीर खानने सुरवातीचे न्यूझीलंडचे ३ फलंदाज किरकोळीत बाद केल्यानंतर असे वाटू लागले की भारताचा विजय दृष्टीक्षेपात आलेला आहे, परंतु पुढे काहीतरी वेगळेच वाढून ठेवले होते. यानंतर फलंदाजीसाठी आला तो न्यूझीलंडचा कर्णधार ब्रॅडॉन मॅक्युलम की ज्याने पहिल्या डावात केवळ ८ धावांची खेळी केली होती.

यानंतर मात्र त्याने भारतीय गोलंदाजांना अजिबात सफल होऊ दिले नाही, दुसऱ्या बाजूला थोड्या-थोड्या अंतराने एक-एक खेळाडू बाद होत असताना याने एक बाजू लावून धरली आणि ५२-३ अशा अवस्थेतून ६२५-७ अशा भरभक्कम स्थितीत संघाला नेऊन ठेवले. यादरम्यान त्याने तब्बल ३०२ धावांचा डोंगर रचताना न्यूझीलंडच्या क्रिकेट इतिहासातील पहिला त्रिशतकवीर होण्याचा सन्मान मिळवला. अर्थात हाच सामना नंतर भारतीय संघाने कोहलीच्या शतकीय कामगिरीच्या बळावर अनिर्णित राखण्यात यश मिळाले परंतु काही काळासाठी का होईना भारतीय संघाला अडचणीत आणण्याचे काम या खेळाडूने नक्कीच केले होते.

हा खेळाडू तसा भारतीय चाहत्यांना अगदीच नवीन किंवा लांबचा असे मुळीच नाही, इंडियन प्रीमियर लीगच्या पहिल्याच मोसमात कोलकता नाईट रायडर्सकडून धावांचा रतीब घालणारा हा खेळाडू, अगदी पहिल्या IPL च्या पहिल्याच सामन्यात दीडशतकीय खेळी (१५८) करून भारतीय क्रिकेट चाहत्यांच्या मनात घर करणारा हा प्रतिभावान खेळाडू…

याच खेळाडूच्या नेतृत्वाखाली न्यूझीलंड संघाने २०१५ च्या विश्वचषकात दक्षिण अफ्रिकेसारख्या बलाढ्य संघाला उपांत्यपूर्व सामन्यात D/L नियमानुसार पराभव दाखवला होता आणि अंतिम सामन्यात धडक मारली होती, परंतु दुर्दैवाने अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाकडून त्यांना पराभव स्वीकारावा लागला. या प्रतिभावान खेळाडूस वाढदिवसाच्या भरभरून शुभेच्छा…!

महत्वाच्या बातम्या :-