‘बोठे याचे रेखा जरे यांच्याशी प्रेमसंबंध, बदनामीच्या भीतीने हत्या’, कोर्टात दोषारोप पत्र सादर

अहमदनगर : यशस्विनी महिला ब्रिगेडच्या अध्यक्ष व सामाजिक कार्यकर्त्या रेखा जरे यांच्या खून प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळ बोठे याच्यासह सात आरोपींच्या विरोधात पोलिसांनी पुरवणी दोषारोप पत्र न्यायालयासमोर सादर केले. बोठे याचे रेखा जरे यांच्याशी प्रेमसंबंध होते, या प्रेमसंबंधांमुळे आपली बदनामी होईल, या भीतीपोटीच बोठे याने जरे यांच्या हत्येची सुपारी दिली असे पोलिसांनी दोषारोप पत्रात म्हटले आहे. तपासी अधिकारी तथा पोलीस उपाधीक्षक अजित पाटील यांनी मंगळवारी ही माहिती दिली.

बदनामीची भीती
बाळ बोठे आणि रेखा जरे यांचे खूप दिवस प्रेमसंबंध होते. त्यांच्या या नात्यात क्षुल्लक कारणांवरुन वारंवार वादावादी व्हायच्या. अनेक वेळा त्यांच्यातल्या बाचाबाचीचं रुपांतर मोठ्या भांडणात झालं. यानंतर या प्रकरणात आपली बदनामी होईल या भीतीपोटी बोठेने हेह हत्याकांड घडवलं, असं पोलिसांनी दोषारोप पत्रात म्हटलं आहे. मंगळवारी मुख्य सूत्रधार बोठे व त्याला फरार होण्यास मदत करणाऱ्या अन्य सहा आरोपींच्या विरोधात पाटील यांनी ४५० पानांचे पुरवणी दोषरोपात्र सादर केले. त्यात चौकशीदरम्यान बोठे यांच्याकडून मिळालेल्या माहितीचा तपशील ठेवण्यात आलेला आहे.

यांच्यावर गुन्हे दाखल
बाळ बोठे याच्यासह जनार्दन अकुला चंद्रप्पा, राजशेखर अंजय चाकली, पी. अनंतलक्ष्मी व्यंकट सुब्बाचारी, शेख इस्माईल शेख अली, अब्दुल रहमान अब्दुल अरिफ (सर्व रा. हैदराबाद) व महेश वसंतराव तनपुरे (रा. अहमदनगर) या आरोपीविरोधात हे दोषारोपपत्र दाखल करण्यात आले आहे. बोठे याच्याविरोधात कट रचून खून करणे तर उर्वरित सहा आरोपी विरोधात बोठे याला फरार होण्यास मदत करणे या कलमांतर्गत दोष ठेवण्यात आला आहे.

तर जरे यांच्या हत्येनंतर पोलिसांनी ज्ञानेश्वर ऊर्फ गुडू शिवाजी शिंदे (श्रीरामपूर), फिरोज राजू शेख (राहुरी), आदित्य सुधाकर चोळके (कोल्हार बुद्रुक), सागर भिंगारदिवे व ऋषिकेश पवार (नगर) यांना अटक केली होती. त्यानंतर तीन महिन्यानंतर बाळ जगन्नाथ बोठे याला अटक केली. त्याला फरार होण्यास मदत करणाऱ्या सहा आरोपीविरोधात हे पुरवणी दोषारोप पत्र ठेवण्यात आले असल्याची माहिती पाटील यांनी दिली.

काय आहे प्रकरण?
रेखा जरे यांची ३० नोव्हेंबर २०२० रोजी पारनेर तालुक्यातील जातेगाव घाटात गळा चिरून हत्या केली होती. याप्रकरणी पोलिसांनी सुरुवातीला पाच आरोपींना अटक केली होती. अटक केलेल्या आरोपींकडून हत्याकांडामागे मुख्य सूत्रधार बोठे असल्याची माहिती समोर आली. हत्या झाल्यानंतर बोठे पसार झाला होता. बोठे याला तब्बल १०२ दिवसांनंतर हैदराबादेतून अटक केली.

महत्वाच्या बातम्या

IMP