भाजप आमदारांच्या दोन्ही मुली राष्ट्रवादीतून निलंबित

टीम महाराष्ट्र देशा : अहमदनगर महापालिका महापौरपदाच्या निवडणुकीत भाजपला मदत करणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या 18 नगरसेवकांना निलंबित करण्यात आलंय. पक्षाचा आदेश न पाळल्याप्रकरणी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी ही कारवाई केली. शिवाय अहमदनगर शहर जिल्हाध्यक्ष माणिकराव विधाते यांचीही पदावरुन हकालपट्टी करण्यात आली आहे.

निलंबित करण्यात आलेल्या नगरसेवकांमध्ये आमदार संग्राम जगताप यांच्या पत्नी शीतल जगताप आणि मेहुणी ज्योती गाडे यांचाही समावेश आहे. ज्योती गाडे आणि शीतल जगताप या भाजप आमदार आणि किंगमेकर नेतृत्त्व शिवाजीराव कर्डिले यांच्या मुली आहेत.

भाजपला पाठिंबा दिल्यानंतर राष्ट्रवादीने या नगरसेवकांना उत्तर देण्यासाठी नोटीस पाठवली होती. नोटीशीची मुदत संपल्यानंतर अखेर कारवाई करण्यात आली. आम्ही शहराच्या विकासासाठी भाजपला मतदान केल्याचं राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार संग्राम जगताप यांनी सांगितलं होतं.