महाराष्ट्रातील दोघांना ‘प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार’ प्रदान

नवी दिल्ली – क्रीडा क्षेत्रातील योगदानासाठी एंजल देवकुळे हिला तर कला व सांस्कृतिक क्षेत्रातील कामगिरीसाठी तृप्तराज पंड्या या महाराष्ट्रातील दोन बालकांचा राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते आज ‘प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्काराने’ सन्मान करण्यात आला. प्रजासत्ताकदिनी होणाऱ्या पथसंचलनात बालक सहभागी होणार आहेत.

केंद्रीय महिला व बाल विकास मंत्रालयाच्यावतीने आज राष्ट्रपती भवनाच्या दरबार हॉलमध्ये आयोजित कार्यक्रमात या पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. केंद्रीय महिला व बाल विकास मंत्री मनेका गांधी आणि सचिव राकेश श्रीवास्तव यावेळी उपस्थित होते. पदक, 1 लाख रूपये, 10 हजार रुपयांचे बुक व्हाऊचर आणि प्रमाणपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.

यावर्षी पासूनच केंद्रीय महिला व बाल विकास मंत्रालयाने ‘प्रधानमंत्री राष्ट्रीय पुरस्कार’ दोन श्रेणींमध्ये वितरीत करण्यास सुरुवात केली आहे. याअंतर्गत सृजनात्मकता, शौर्य, सामाजिक सेवा, कला व संस्कृती या क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या 26 बालकांना यावेळी ‘बाल शक्ती पुरस्काराने’ सन्मानित करण्यात आले. एंजल देवकुळे आणि तृप्तराज पंड्या या महाराष्ट्रातील बालकांनाही यावेळी गौरविण्यात आले. पुरस्कार प्राप्त सर्व बालकांना यावर्षी राजपथावर होणाऱ्या प्रजासत्ताक दिन पथसंचलनात सहभागी होण्याचा बहुमानही मिळणार आहे.

एंजल देवकुळे या 10 वर्षाच्या मुलीला ‘स्क्वे मार्शल आर्ट’ क्रीडा प्रकारातील उल्लेखनीय कार्यासाठी हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. विविध जागतिक स्पर्धांमध्ये भारताचे प्रतिनिधीत्व करणारी एंजल ही ‘स्क्वे मार्शल आर्ट’ क्रीडा प्रकारात उत्तम कामगिरी करणारी देशातील सर्वात लहान मुलगी ठरली आहे. एंजल ही आशियातील सर्वात लहान सुवर्णपदक विजेती ठरली असून सात विक्रम तिच्या नावावर आहेत. मलेशिया येथे होऊ घातलेल्या स्क्वे चॅम्पियनशिपसाठीही एंजलची निवड झाली आहे.

मुंबई येथील मुंलुंड भागातील तृप्तराज पंड्या या 12 वर्षाच्या बालकाने तबला वादनात लौकिक मिळवला आहे. गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रिकॉर्डने तृप्तराज च्या तबलावादनाची नोंद घेत जगातील सर्वात कमी वयाचा तबला तज्ज्ञ म्हणून गौरविले आहे. तृत्पराजने वयाच्या दुसऱ्या वर्षीच तबला वादनाचा जाहीर कार्यक्रम सादर केला असून आकाशवाणी व दूरचित्रवाहिण्यांवरही त्याने प्रस्तुती दिली आहे व 200 लाईव्ह कार्यक्रम केले आहेत.

Loading...

यावेळी 2 व्यक्ती आणि 3 संस्थांना ‘प्रधानमंत्री राष्ट्रीय पुरस्कार’ अंतर्गत बाल कल्याण पुरस्कार प्रदान करण्यात आला.

2 Comments

Click here to post a comment