#corona : बोनी कपूर यांच्या नोकराला कोरोनाची लागण; संपूर्ण कुटुंब क्वारंटाइन

boni kapur

मुंबई : राज्याची राजधानी असलेल्या मुंबईला कोरोनाने विळखा घातला असून येथील रुग्ण संख्या वाढतच आहे. अशातच बॉलिवूडमध्येही कोरोनाने शिरकाव केला असून कलाकार, त्यांच्या कुटुंबियांनाही कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलं आहे.

मिळालेल्या माहितीनुसार चित्रपटसृष्टीतील निर्माते बोनी कपूर यांच्या घरातील काम करणारा एक व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह आल्याचं समोर आलं आहे. तसेच बोनी कपूर यांच्या लोखंडवाला स्थित घरात काम करणारा 23 वर्षीय नोकराची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे. काम करणारा हा तरुण गेल्या शनिवारी आजारी होता. त्यानंतर बोनी कपूर यांनी त्याला टेस्ट करण्याचं सांगितलं होतं. त्याला आयसोलेशनमध्ये ठेवण्यात आलं. टेस्टचे रिपोर्ट्स पॉझिटिव्ह आल्यानंतर त्यांच्या सोसायटी आणि बीएमसीच्या अधिकाऱ्यांना याबाबत माहिती देण्यात आली.

तसेच सोशल मीडियावर चाहत्यांनी चिंता व्यक्त केल्यानंतर बोनी कपूर म्हणाले, ‘माझी मुलं माझ्यासोबत आहेत आणि ते सर्व ठिक आहेत. माझे इतर कर्मचारीही ठिक आहेत. आतापर्यंत आमच्यापैकी कोणामध्येही कोरोनाची लक्षणं दिसली नाहीत. विषेश म्हणजे लॉकडाऊनच्या आधीपासूनच आम्ही आमच्या घरात आहोत. आम्ही घराबाहेर गेलोच नव्हतो.’

दरम्यान, देशात कोरोनाबाधितांचा आकडा दिवसेंदिवस वाढत चालला आहे. चिंतेची बाब म्हणजे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून जाहीर करण्यात आलेल्या आकडेवारीनुसार एका दिवसात 134 जणांचा मृत्यू झाला आहे. तर दुसरीकडे एका दिवसात तब्बल 4 हजार 970 नवीन कोरोनाग्रस्तांची भर पडली आहे.