मोदींविरोधात बोलल्यामुळे बॉलीवूडच्या ऑफर्स मिळणं बंद झालं- प्रकाश राज

मुंबई: पंतप्रधान मोदींवर टीका करण्याचा एककलमी अजेंडा हाती घेतलेले अभिनेते प्रकाश राज यांनी आता चक्क बॉलीवूडला आरोपीच्या पिंजऱ्यात उभा केलं आहे. पंतप्रधान मोदींवर टीका करायला लागल्यापासून बॉलीवूडनं मला चित्रपटाच्या ऑफर्स देणं थांबवलं, असा गौप्यस्फोट अभिनेते प्रकाश राज यांनी केला आहे. जेव्हापासून मी मोदी आणि भाजपच्या विरोधात आवाज उठवण्यास सुरुवात केलीय, तेव्हापासून मला बॉलीवूडमधून चित्रपट मिळत नसल्याचा आरोप ‘द प्रिंट’शी बोलताना प्रकाश राज यांनी केला.

नेमकं काय म्हणणं आहे प्रकाश राज याचं ?
‘गेल्या वर्षी ऑक्टोबर महिन्यात मी पहिल्यांदा पंतप्रधान मोदींविरोधात भूमिका घेतली होती. तेव्हापासून मला बॉलीवूडनं बाजूला टाकलंय. दक्षिण भारतात कोणतीही समस्या नाही. मात्र बॉलीवूडमधून चित्रपटाच्या ऑफर येणं बंद झालंय, गौरी लंकेश प्रश्न विचारत होत्या. त्यांची हत्या करण्यात आली, तेव्हापासून मी स्वत:लाच दोषी मानू लागलो. लंकेश यांच्या संघर्षात आपण त्यांना एकटं सोडलं होतं का? याबद्दल मी जितके प्रश्न विचारतो, तितके मला गप्प करण्याचे प्रयत्न होतात. मला धमक्या दिल्या जातात आणि हे भाजपाकडून केलं जातंय.